नवी दिल्ली : 'कटाप्पाने बाहुबलीला का मारलं?' असा प्रश्न बाहुबली-२ प्रदर्शित होईपर्यंत देशातील जनतेला पडला होता. सध्या देशातील जनेतला 'पेट्रोल कधी स्वस्त होणार?' हा प्रश्न पडला आहे. पेट्रोल स्वस्त होण्यासाठी अनेक मार्ग अनेकांनी सांगितले आणि सांगतही आहेत. इंधानाचे दर कमी करण्याचे सल्ले देणाऱ्यांच्या यादीत आता बाबा रामदेव यांचीही भर पडली आहे. मात्र इंधानाचे दर कमी का होऊ शकत नाहीत, हे सांगायलाही बाबा रामदेव विसरले नाही.


पेट्रोल, डिझेलचे दर 35-40 होऊ शकतात


पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत बाबा रामदेव यांनी चिंता व्यक्त केली आहे. बाबा रामदेव म्हणाले की, 'मला खेद आहे की पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलची किंमत सर्वसामन्यांना परडवत नाही, हे कळत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सरकार चालवायचे आहे. पेट्रोल, डिझेलमधून मिळणाऱ्या कराचं प्रमाण सर्वाधिक आहे. पेट्रोल, डिझेलवरील कर हटवल्यास 35-40 रुपयांनांही उपलब्ध होऊ शकतं. मात्र पेट्रोल, डिझेलवरील कर हटवल्यास सरकारची तिजोरी रिकामी होण्याची भिती आहे.' एबीपी न्यूजच्या 'योग संमेलन' कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते.


इंधन दरवाढीचा यूपीए सरकारलाही फटका


पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका यूपीए सरकारलाही बसला होता. यूपीए सरकारची कोंडी करण्यासाठी 2014मध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीचा मुद्दा भाजपने लावून धरला होता. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेल 35 रुपयांना मिळू शकतं, असा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. मात्र अद्याप तरी ते शक्य झालेलं नाही.


कर्नाटक निवडणुकीनंतर इंधर दरवाढ


कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. इंधन दरांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेलं नाही. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. मात्र कर्नाटक निवडणुकीनंतर इंधन दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली.