Jobs in High Court: न्यायालयात नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. कोर्ट मास्टर, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, टायपिस्ट, कनिष्ठ सहाय्यक, परीक्षक आणि इतर अनेक पदांसाठी उच्च न्यायालयाने 1000 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 जानेवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
रिक्त पदांची संख्या
तेलंगणा उच्च न्यायालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी एकूण 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळं कोर्टात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना ही मोठी संधी आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. रिक्त असणाऱ्या पदांचा सविस्तर तपशील देखील तेलंगणा उच्च न्यायालयानं दिला आहे. या पदांमध्ये कोर्ट मास्टरच्या 12, कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 11, असिस्टंटच्या 42, परीक्षकाच्या 24, टायपिस्टच्या 12, कॉपीिस्टच्या 12, सिस्टम ॲनालिस्टच्या 20, ऑफिस सबऑर्डिनेटच्या 75, स्टेनोग्राफर ग्रेड IIच्या 45, कनिष्ठ सहाय्यकच्या 340 पदांचा समावेश आहे. फील्ड असिस्टंटसाठी 66, प्रोसेस सर्व्हरसाठी 130, रेकॉर्ड असिस्टंटसाठी 52 आणि कार्यालय अधीनस्थांच्या 479 पदांचा समावेश आहे. दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया ही येत्या 8 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी असणार आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकची माहिती हवी आहे, त्यांनी tshc.gov.in या वेबसाईटवर पाहावी. या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कसा कराल अर्ज?
सर्व प्रथम तेलंगणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट (tshc.gov.in) वर जा.
मुख्यपृष्ठावर दिलेल्या सूचनेवर क्लिक करा.
वेगवेगळ्या पोस्टसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरून नोंदणी क्रमांक मिळवा.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर, एक अद्वितीय क्रमांक तयार होईल.
भविष्यातील वापरासाठी अर्ज डाउनलोड करा आणि मुद्रित करा.
वयोमर्यादा: या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांचे वय 18 ते 34 वर्षांच्या दरम्यान असावे. 1 जुलै 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.
लेखी परीक्षा
काही पदांसाठी संगणकावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत एकूण 90 प्रश्न असतील, त्यापैकी 50 प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित असतील आणि 40 प्रश्न सामान्य इंग्रजीशी संबंधित असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि उमेदवारांना परीक्षेसाठी 120 मिनिटे मिळतील.