Vodafone Layoffs : जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोनने (Vodafone) 11,000 कर्मचार्‍यांना कामावरुन (Layoffs) कमी करण्याचे सांगितले आहे. कंपनीमध्ये कठोर बदलांची गरज आहे, असं कंपनीच्या सीईओ मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी म्हटलं. पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीनंतर कंपनीने ही घोषणा केली आहे.


सीईओंनी सांगितलं की, कंपनीची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. अशा परिस्थितीत कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज भासू लागली आहे. सध्या जगभरात 1,04,000 कर्मचारी आहेत. कंपनीकडून कर्मचाऱ्यांची प्रक्रिया तीन वर्षांत पूर्ण करण्याची योजना आहे.


"ग्राहक, साधेपणा आणि विकास हे आमचे प्राधान्य आहे. अशा स्थितीत दूरसंचार क्षेत्राच्या शर्यतीत राहण्यासाठी गुंतागुंत दूर करण्याबरोबरच संस्थेचं काम सोपं आणि सुलभ करु. आमच्या ग्राहकांना अपेक्षित दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही संसाधनांचं फेरवाटप करु, जेणेकरुन व्होडाफोन व्यवसायाच्या दृष्टीने पुढे जाईल. या कारणास्तव नोकऱ्या कमी करणे आवश्यक आहे," असं मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी सांगितलं.


ग्राहक बाजार पुन्हा जिंकण्यासाठी, आम्ही मूलभूत गोष्टींवर पुन्हा लक्ष केंद्रित करु आणि ग्राहकांना अपेक्षित असलेला "साध्या आणि अंदाजित अनुभव" देऊ, असं कंपनीने म्हटलं.


कमाई कमी झाल्याने कर्मचारी कपातीचा निर्णय


कंपनीची कमाई 1.3 टक्के म्हणजेच 14.7 अब्ज युरोवर एवढीच झाली, जी मुळात 15 ते 15.5 अब्ज युरोपेक्षा कमी आहे. जर्मनीतील उच्च ऊर्जा खर्च आणि व्यावसायिक कामगिरीतील घसरणीमुळे कमाईत घट झाल्याचं कंपनीने सांगितलं आहे. पुढील वर्षी उत्पन्नात आणखी घट अपेक्षित आहे, जी 13.3 अब्ज युरोपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज कंपनीने वर्तवला आहे.


भारतातही परिणाम होणार?


व्होडाफोन भारतात आयडियासोबत मिळून काम करत आहे. भारतातीही कंपनी तोट्यात आहे. बिर्ला समूहाने हे जॉईंट व्हेंचर पुन्हा मजबूत करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडियाचा मार्ग सोपा नाही. व्होडाफोनने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम भारतातही दिसून येतो आणि कर्मचारी कपात इथेही होऊ शकते. बिर्ला समूहाच्या संमतीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.


कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठा कपात


व्होडाफोन समूहाचा भारतासह अनेक देशांमध्ये बिझनेस आहे. या कंपनीत सुमारे 1 लाख लोक काम करतात. 11,000 कर्मचाऱ्यांची  कपात ही या कंपनीतीली आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे. जागतिक स्तरावर एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणारी व्होडाफोन ही दूरसंचार क्षेत्रातील ही पहिलीच कंपनी असावी.