नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुण तरुणींना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समध्ये केली जाणार आहे. रेल्वेच्या अधिकृत जाहिरातीनुसार 4660 पदांसाठी भरती केली जाणार आहे. 


रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुरुवात १५ एप्रिल पासून झालेली आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १४ मे पर्यंत आहे. 


किती पदांसाठी भरती?


रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समध्ये एकूण 4660 पदांची भरती केली जाणार आहे. उपनिरीक्षक पदासाठी 452 जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी 4208 जागा आहेत. 


वयाची अट किती?


उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुण आणि तरुणीचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तर, कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुण तरुणींचं वय हे 18 ते 28 दरम्यान असणं आवश्यक आहे. 


परीक्षा पद्धत आणि परीक्षा शुल्क


रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून आरपीएफ भरतीसाठी उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदाची परीक्षा प्रक्रिया पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड  टेस्ट आणि त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, फिजिकल मेजरमेंट टेस्ट अशा पद्धतीनं घेतली जाईल. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 500 रुपये असेल. तर एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमन, महिला, अल्पसंख्यांक, ईडब्ल्यूएस साठी परीक्षा 250 रुपये असेल.  



शैक्षणिक पात्रता काय?


उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 35 हजार 400 रुपये वेतन मिळेल. तर कॉन्स्टेबल पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 21 हजार 700 रुपये पगार मिळेल.


दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या अतंर्गत येणाऱ्या आरपीएफ भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करताना आरपीएफ भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत जाहिरात वाचून अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. आरपीएफ भरतीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी योग्य माहिती सादर करणं आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी आरपीएफ भरतीसाठी अर्ज दाखल करताना अंतिम मुदतीची वाट पाहत बसण्यापेक्षा लवकरात लवकर अर्ज करुन कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या : 


 रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु


 Government Job : 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी मोठी संधी! 22,000 हून अधिक सरकारी नोकऱ्या, लाखात पगार मिळणार