मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत राज्य सेवा मुख्य परीक्षा एक महिन्यानं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा  27, 28 आणि  29 मे या तीन  दिवसांच्या कालावधीत होईल. यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणं राज्य सेवा मुख्य परीक्षा 26 ते 28 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती. मात्र, काही विद्यार्थ्यांकडून आयोगाकडे तांत्रिक समस्या दूर करणे आणि मुदतवाढ देण्यासंदर्भात विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या निवेदनांचा विचार करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षा एक महिना लाबणीवर टाकली आहे. 

Continues below advertisement


आयोगानं परिपत्रकात काय म्हटलं? 


महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मधील राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल 12 मार्च 2025 रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या पूर्व परीक्षेच्या निकालातून पात्र ठरलेल्या काही EWS अथवा OPEN मधून SEBC अथवा OBC पर्याय निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून न आल्याने यासंदर्भात उमेदवारांकडून निवेदने मिळाली होती.या प्रकरणाची वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे, असं आयोगानं स्पष्ट केलं.


 
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 साठी परीक्षेपूर्वी दिनांक 24 जुलै, 2024 रोजीच्या शुद्धिपत्रकाद्वारे आयोगातर्फे Link उपलब्ध करून देण्यात आली होती त्यावेळी सदर शुद्धिपत्रकानुसार एसईबीसी अथवा इ.मा.व. प्रवर्गातील विकल्प दिलेल्या उमेदवारांकडून नॉन क्रिमिलेअर "Yes" किंवा "No" असा दावा करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. तथापि, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 साठी एसईबीसी अथवा इ.मा.व. वर्गवारीचा विकल्प दिलेल्या बऱ्याच उमेदवारांनी NCL संदर्भात "Yes" किंवा "No" असा कोणताही दावा केलेला नसल्याने अशा उमेदवारांचा मूळ अर्जातील दावा कायम राहिला.



प्रस्तुत प्रकरणी उमेदवारांकडून प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता ज्या अराखीव अथवा आ.दु.घ. वर्गवारीतील उमेदवारांनी एसईबीसी अथवा इ.मा.व. असा विकल्पाचा दावा केला आहे, परंतु NCL बाबत कोणताही दावा केला नाही, अशा उमेदवारांना त्यांनी यापूर्वी आयोगाच्या शुद्धिपत्रकास अनुसरून दिलेल्या विकल्पाच्या दाव्यानुसार त्यांचा एसईबीसी अथवा इ.मा.व. वर्गवारीचा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी दावा त्यांचे NCL प्रमाणपत्र मुलाखतीच्या टप्प्यावर तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला व यासंदर्भात दिनांक 29 मार्च, 2025 रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. तसेच या निर्णयामुळे दिनांक 12 मार्च, 2025 रोजीच्या निकालामध्ये सुधारणा करून सुधारित निकाल दिनांक 29 मार्च, 2025 रोजी जाहीर करण्यात आला. सुधारित निकालाप्रमाणे नव्याने पात्र ठरलेल्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक   वर्गवारीतील 318 उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरले.



राज्य सेवा पूर्व परीक्षा2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल, 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाली आहेत. उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 व 29 मे, 2025 या कालावधीत घेण्यात येईल. आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एकवेळची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.