जालना : पोलिसांची खाकी वर्दी नेहमीच टीकेची धनी होते, कारण पोलिसांकडूनही (Police) सर्वसामान्य नागरिकांपेक्षा राजकीय नेते, गुंड आणि पैसेवाल्यांना पाठिशी घालण्याचं काम होत असतं. तर, कित्येकदा पैसे खाल्ल्याशिवाय पोलीस कामच करत नाहीत, अशी धारण सर्वसामान्य नागरिकांची आहे. त्यामुळे, पोलीस स्टेशनची पायरी चढायलाही ते घाबरतात. मात्र, प्रत्येक पोलीसवाल्यांमध्ये एक माणूस दडलेला असतो. खाकी वर्दीत असलेल्या माणुसकीच दर्शन आज जालना (Jalna) - परभणी रोडवर पाहायला मिळालं. परभणीच्या पोलीस अधीक्षकांची गाडी छ. संभाजीनगरवरून परभणीकडे (Parbhani) जात असताना त्यांना भरउन्हात वृद्ध आजी काटी टेकवत टेकवत जात असल्याचं दिसले. त्यानंतर, एसपी साहेबांनी आपला गाडी थांबवून त्या आजीबाईंना मदत करत रुग्णालयात पाठवलं.
परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहुन शासकीय कामकाज आटोपून अंबड-घनसावंगी मार्गे परत परभणीकडे जात होते. अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर त्यांना भर उन्हात एक 80 ते 90 वर्षे वयोगटातील वृद्ध आजी दिसली. वार्धक्याने जर्जर झालेल्या आजीच्या पायातील चपलाही अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, या वृद्ध आजीला वयोमानानुसार बोलताही येत नव्हतं. चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची त्या नजर गेली आणि त्यांनी वाहन थांबवले. आजीला स्वतःजवळ असलेले पाणी पाजून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत शेजारी असलेल्या झाडाखाली स्वतः हाताने आधार देत नेऊन बसवले. एवढेच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन मदत केली. त्यानंतर, पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क करून त्या आजीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना केल्या.
वरिष्ठ अधिकारी परदेशी यांच्या सूचनेवरुन बारवाल यांनी तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे यांना घटनास्थळी शासकीय वाहनातून पाठविले. पोलिसांचे वाहन येईपर्यंत घटनास्थळी असलेल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्ध आजीला पोलीस वाहनात बसवून दिले. त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले. एसपी परदेशी साहेबांच्या माणुसकीचे दर्शन झाल्याने खाकी वर्दीतली माणूसकी पाहायला मिळाली. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाले असून परदेशी साहेबांच्या कृतज्ञता आणि संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे.
दरम्यान, अंबड पोलीस परदेशी यांच्या सूचनेनुसार वृद्ध आजीला अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आजी अंबड तालुक्यातील बेलगांव येथील असून, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. सहसा पोलिसांवर सर्वसामान्य नागरिकांचा राग असतो, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील असा संवेदशीलपणा व माणुसकी पाहून अशा पोलिसांना नक्कीच सॅल्यूट करावा वाटतो.
हेही वाचा
हिंदुत्त्व नाही लाज सोडली, बाळासाहेबांचा AI आवाज; एकनाथ शिंदेंचा दरेगावातून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल