MPSC Group C Recruitment 2022 Last Date : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेत लगेचच अर्ज करा.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच एमपीएससीकडून (MPSC) ग्रुप सी पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रियेला आधीच सुरुवात झाली होती. आज या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी जर या भरतीसाठी अद्याप अर्ज केला नसेल. तर लगेचच अर्ज करून या संधीचा लाभ घ्या. आज 22 ऑगस्ट 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.
रिक्त पदांचा तपशील
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) ग्रुप सी अंतर्गत 228 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
MPSC ग्रुप सी पदांवर भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केलं जाईल. MPSC ग्रुप सी पदांवर भरतीसाठी 05 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जाईल. ही भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक 077/2022 नुसार विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. पूर्व परीक्षेत पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतली जाईल.
परीक्षेचा पॅटर्न
एमपीएससी ग्रुप सी पदांसाठी 100 गुणांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. तर मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. पूर्व परीक्षेत पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. या पदांसाठी 18 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला सूट मिळेल. पदांसाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना वाचू शकता.
अर्जाचं शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना 394 रुपये शुल्क भरावं लागेल. दरम्यान आरक्षित वर्गाला शुल्कात सूट मिळेल.