मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या भरतीसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
MPSC Group C Combined Pre Exam : गट क संयुक्त पूर्व परीक्षा किती जागांसाठी?
उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक सहायक पदाच्या 4 जागा, कर सहायक 73 जागा आणि लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात 7 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता होईल. तर, अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक 27 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत असेल. ऑनलाईन शुल्क देखील 27 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत स्वीकारलं जाणार आहे. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चलनाद्वारे शुल्क भरणार असल्यास ते 29 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत घेता येईल. त्यानंतर 30 ऑक्टोबरला कार्यालयीन वेळेत स्टेट बँकेच्या शाखेत चलन भरावं लागणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेला अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणं आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक पदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे.
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा दोन टप्प्यात पार पडणार आहे. संयूक्त पूर्व परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी असेल तर संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल. लिपिक टंकलेखक आणि करसहायक पदासाठी टंकलेखन कौशल्य याचणी द्यावी लागणार आहे.
किती फी भरावी लागणार?
खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये पूर्व परीक्षेचं शुल्क असेल. तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये शुल्क असेल. मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये खुल्या प्रवर्गासाठी,मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 344 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये परीक्षा शुल्क असेल.