Maharashtra Assembly Winter Session : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Assembly Winter Session) वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात लवकरच (Recruitment Of Doctor, Technicians) डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे.


"सध्या 28 टक्के पदे रिक्त"
अधिवेशनात गिरीश महाजन म्हणाले, आम्हीं एमपीएसच्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो. महाजन पुढे म्हणाले, आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल.


 


"जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करू"
नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटलं तरी ते शक्य होतं नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येईल असे महाजन म्हणाले.



"त्या डॉक्टरांना पदावरून हटवलं"
यवतमाळ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील वैष्णवी बागेश्वर नावाच्या 17 वर्षीय तरुणीचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळं मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावर महाजन म्हणाले, वैष्णवीला जेएमसी नागपूर येथे आणण्यात आलं होतं. त्यावेळी व्हेंटिलेटर तिथं उपलब्ध न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याठिकाणी असणारे डॉक्टर यांच्यावर आरोप झाले. त्यावेळी म्हैसेकर नावाच्या डॉक्टरांची समिती नेमली. त्याठिकाणी डीन गुप्ता यांना तत्काळ कार्यमुक्त केलं आहे आणि  डॉ. सपकाळ जे व्हेंटिलेटर उपलब्ध करू शकले असते त्यांनी न केल्यामुळे त्यांना पदावरून हटवलं आहे.



"2024 पर्यंत J J सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल"
गिरीश महाजन पुढे म्हणाले, मेडिकल कॉलेज बाबत आपण लवकरच निर्णय घेतोय. अधिक मनुष्यबळासह हॉस्पिटल सुरू करण्यात येतील. तसेच राज्यात 10 हजार खोल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी बांधण्याची गरज आहे. आम्ही सीएसअरच्या माध्यमातुन हा प्रश्न आम्ही मांडत आहोत. 2024 पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करत आहोत. तसेच रिचर्ड अँड क्रुडास येथील जागा जी 99 वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत 20 वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा जे जे ला मिळाली तर मोठा फायदा होणार आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल असं महाजन म्हणाले.