चेन्नई : भारतातील राष्ट्रीयीकृत बँकांपैकी एक असलेल्या इंडियन बँकेमध्ये 300 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. ही भरती प्रक्रिया स्थानिक बँक अधिकारी म्हणजेच लोकल बँक ऑफिसर्स या पदासाठी राबवण्यात येत आहे. इंडियन बँकेनं या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.  या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर असून पात्र उमेदवार यासाठी अर्ज दाखल करु शकतात. 


किती जागांसाठी भरती?


इंडियन बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित बँक आहे. या बँकेच्या चेन्नईतील मुख्यालयाद्वारे स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदावर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. या राज्यांतील स्थानिक भाषेला परीक्षेत प्राधान्य दिलं जाईल.


तामिळनाडूत 160 जागा, कर्नाटकमध्ये 35, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणात 50, महाराष्ट्रात 40 आणि गुजरातमध्ये 15  अशा एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये आरक्षण देखील असणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 44, अनुसूचित जमाती साठी 21, ओबीसी प्रवर्गासाठी 79, आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी 29, खुल्या प्रवर्गासाठी 127 आणि इतर प्रवर्गासाठी 12 जागा राखीव असतील. 


वयोमर्यादा :


स्थानिक बँक अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 30 वर्षां दरम्यान असलं पाहिजे. 


शैक्षणिक पात्रता


इंडियन बँकेतील स्थानिक बँक अधिकारी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 1 जुलै 2024 रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा केंद्र सरकारनं मान्यता दिलेल्या संस्थेतून समकक्ष पात्रता धारण करत असावा. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर आहे. 



स्थानिक बँक अधिकारी पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे आहेत. याशिवाय फी देखील ऑनलाईन भरायची आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये शुल्क द्यावं लागेल. तर, इतर सर्व प्रवर्गांसाठी 1 हजार रुपये परीक्षा फी निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत असं या परीक्षेचं स्वरुप असेल.  ऑनलाईन परीक्षेसाठीचा वेळ हा तीन तासांचा असेल. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बँकेत रुजू होणाऱ्या उमेदवारांना 48 हजार ते 85 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.


अधिक माहितीसाठी उमेदवारांनी इंडियन बँकेच्या करिअर या पेजला भेट द्यावी आणि मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत. 


इतर बातम्या :


जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या


मोठी बातमी! रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 5254 जागांसाठी भरती, पात्रता काय? कसा कराल अर्ज?