Amazon Layoffs : आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत चढउतार पाहायला मिळत आहे. अमेरिका, युरोप या देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक कंपन्या सध्या तोट्यात आहेत. त्यामुळे कंपन्या आपला खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर ॲमेझॉनने (Amazon) 10,000 कर्मचारी (Employee) कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. Amazon च्या या घोषणेपूर्वी, मेटा (Meta), ट्विटर (Twitter), स्नॅप आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या इतर मोठ्या टेक कंपन्यांनी आधीच कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. अॅपलसारख्या कंपन्यांनीही नोकऱ्यांची संख्या कमी केली आहे. यापुढे मोठ्या टेक कंपन्या देखील भविष्यातील कठीण काळासाठी सज्ज असल्याचं बोललं जातंय. जागतिक मंदीच्या चर्चेमुळे ज्या टेक कंपन्या मोठ्या खर्चासाठी ओळखल्या जातात, त्या आता खर्चात कपात करताना दिसत आहेत.
कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली माहिती
सुत्रांच्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीला ( Amazon.com Inc ) नुकसान सहन करावं लागतं आहे. ॲमेझॉन कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे कंपनी खर्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक कंपन्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात करत कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे हार्डवेअर प्रमुख डेव्ह लिंप यांनी बुधवारी कर्मचार्यांना मेमो दिले, ज्यात लिहिले होते, "मला ही बातमी कळवताना खूप दु:ख होत आहे. कंपनी कर्मचार्यांना सूचित करत आहे की, आम्ही डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस विभागमधील प्रतिभावान Amazonian गमावणार आहोत..." तसेच कंपनी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा विचार करत आहे.
सर्वात मोठी कर्मचारी कपात
Amazon आपल्या कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजी विभागातील सुमारे 10,000 लोकांना काढून टाकणार असल्याची बातमी सर्वप्रथम न्यूयॉर्क टाइम्सने दिली. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात होत असल्याचं बोललं जातंय. या कर्मचारी कपातीचा परिणाम ॲमेझॉनच्या रिटेल, डिवायसेस आणि मानव संसाधन विभागांवर याचा मोठा परिणाम होईल. यापूर्वी ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्समध्ये ॲमेझॉनकडून मोठ्या प्रमाणावर खर्चात कशी कपात करण्यात येणार हे सांगण्यात आले होते.
मेटाने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले
फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 9 नोव्हेंबर रोजी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या कपातीवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. टेक कंपन्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच हा साथीचा रोग संपल्यानंतरही याचा परिणाम होईल असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्यामुळे आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.