LIVE : ममता सरकार विरुद्ध सीबीआय वाद
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात मेट्रो सिनेमासमोर धरणं आंदोलन करत आहेत.
पार्श्वभूमी
कोलकाता : कोलकात्यामध्ये रात्री उशिरापर्यंत हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता. देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर कोलकाता पोलिसांनी कारवाई केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली. सीबीआय या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात मेट्रो सिनेमासमोर धरणं आंदोलनही सुरु केलं. ममता बॅनर्जी दुपारी आंदोलनस्थळीच कॅबिनेटची बैठकही घेणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात पोलिस आयुक्त राजीव कुमारही सहभागी झालेले दिसले. ममता यांच्या आंदोलनाला विरोधीपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार आहे, तर भाजपही ममता सरकारविरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.
केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ममता बॅनर्जींना समर्थन दिलं आहे. भाजप आणि मोदींनी भारतीय संस्थांवर वचक बसवल्याचा दावाही राहुल गांधींनी केला.
सपा अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. हा गैरसंविधानिक आणि लोकशाहीविरोधी प्रकार असून सीबीआयचा राजकीय मोहऱ्यांसारखा वापर करु नये, असंही ते म्हणाले. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शाह-मोदी जोडीवर निशाणा साधत ममता बॅनर्जींच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.
काय आहे प्रकरण?
रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआयने कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कारवाईपासून फक्त रोखलंच नाही, तर त्यांना बेड्या ठोकून पोलिस स्टेशनमध्ये नेलं. त्यानंतर सीबीआयच्या सर्व अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आलं असलं तरी दोन तपास यंत्रणा यानिमित्ताने आमनेसामने आल्या. या सर्व प्रकारामुळे कोलकात्यात सध्या एकप्रकारचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावरुन सीबीआयने ही कारवाई केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी आपल्याला त्रास देत असून अजित दोभाल यांच्या इशाऱ्यावर ही कारवाई सुरु असल्याचंही ममतांनी म्हटलं आहे. वॉरंटविना पोलिस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची सीबीआयची हिंमतच कशी झाली? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
शारदा चिटफंड घोटाळा
शारदा चिटफंड घोटाळा जवळपास 3 हजार कोटी, तर रोझ व्हॅली घोटाळा अंदाजे 15 हजार कोटींचा असल्याचा आरोप आहे. एप्रिल 2013 मध्ये शारदा घोटाळा समोर आला होता. शारदा ग्रुपच्या कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले होते आणि ते परत केलेच नाहीत.
गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी सुरु केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. घोटाळा उघड झाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं. शारदा ग्रुपने जवळपास 10 लाख गुंतवणूकदारांना फसवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -