Zindagi Na Milegi Dobara 2: जिंदगी ना मिलेगी दोबारा (Zindagi Na Milegi Dobara) या सिनेमाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. 2011 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने मैत्री, प्रेम आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. आता तब्बल 15 वर्षांनंतर सिनेमाच्या सीक्वेलबाबत दिग्दर्शिका झोया अख्तरने या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत महत्त्वाची अपडेट दिलं आहे.

Continues below advertisement

'जिंदगी ना मिलेगी दोबारा 2'वर काम सुरू

ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. आता झोया अख्तरने स्वतः सीक्वेलबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

Continues below advertisement

'द हॉलीवुड रिपोर्टर'शी संवाद साधताना झोया अख्तरने सांगितलं की, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलवर सध्या काम सुरू आहे. मात्र, केवळ सीक्वेल बनवण्यासाठी सीक्वेल करायचा नसून, आजच्या काळाशी आणि त्या व्यक्तिरेखांशी प्रामाणिक वाटेल अशी कथा मिळणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अर्जुन, कबीर आणि इमरान पुन्हा दिसणार?

पहिल्या भागात ऋतिक रोशनने अर्जुन, फरहान अख्तरने इमरान आणि अभय देओलने कबीरची भूमिका साकारली होती. तीन मित्रांची स्पेनमधील रोड ट्रिप, त्यांच्या आयुष्यातील नातेसंबंध आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याचा प्रवास या सिनेमातून दाखवण्यात आला होता.

या तिघांसोबत कतरिना कैफ, कल्कि कोचलिन आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. रिलीज होऊन 15 वर्षे झाली तरी हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत आहे.

2025 मध्ये आलेले ऋतिक- फरहान -अभय पुन्हा एकत्र

2025 मध्ये ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल एका जाहिरातीत पुन्हा एकत्र दिसले होते. पडद्यावर तिघांना एकत्र पाहून चाहत्यांमध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा 2'ची चर्चा पुन्हा रंगली. काही चाहत्यांना तर हा सीक्वेलचा टीझरच असल्याचं वाटलं होतं.

आता झोया अख्तर यांच्या वक्तव्यामुळे सीक्वेलच्या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे. मात्र, चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट किंवा कलाकारांच्या सहभागाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे 15 वर्षांनंतर अर्जुन, कबीर आणि इमरानची कहाणी नेमकी कुठे पोहोचली आहे, हे पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.