Zee 5 Webseries Teaser: देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन सुरू असतानाच ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 ने 'द स्कॅम- लीक्ड' (The Scam- Leaked) या नव्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. 22 जुलै रोजी या मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीत NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ CJP च्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. 20 जुलै रोजी संसद मोर्चाही काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केल्याने वातावरण आणखी तापले. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. अशा पार्श्वभूमीवर ZEE5 ने पेपरफुटीवर आधारित वेबसीरिजची घोषणा केल्याने या टीझरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Continues below advertisement

'द स्कॅम- लीक्ड'चा टीझर रिलीज

ZEE5 ने 'द स्कॅम- लीक्ड' या वेबसीरिजचा टीझरही प्रदर्शित केला आहे. ही वेबसीरिज सध्या गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर आधारित आहे की वेगळी कथा मांडणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा टीझर प्रदर्शित झाल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

टीझरमध्ये नेमकं काय आहे?

1 मिनिटे 10 सेकंदांच्या या टीझरमध्ये कोणताही संवाद नाही. फक्त दृश्यांच्या माध्यमातून कथा उलगडताना दिसते. सुरुवातीला एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मेडिकल प्रवेश परीक्षेचे प्रश्नपत्रिका छापल्या जात असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिका लिफाफ्यात सीलबंद करून बॉक्समध्ये भरल्या जातात आणि एका व्हॅनमधून पाठवण्यात येतात.यानंतर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे प्रश्नपत्रिकेची प्रत देताना दिसते. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते वेगाने व्हायरल केले जातात. काही क्षणांतच 'पेपरफुटी झाली' अशी बातमी सर्वत्र पसरते. शेवटी एका खोलीत गळफास घेतलेल्या तरुणाचे दृश्य दाखवण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण टीझर अधिकच धक्कादायक ठरतो.

Continues below advertisement

रिलीज डेट अद्याप गुलदस्त्यात

सध्या प्रदर्शित करण्यात आलेला व्हिडिओ हा केवळ घोषणा टीझर आहे. 'द स्कॅम- लीक्ड' ही वेबसीरिज नेमकी कधी प्रदर्शित होणार, याबाबत ZEE5 कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. टीझरच्या शेवटी "Coming Soon" एवढाच उल्लेख करण्यात आला आहे.