Zareen Khan : बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसते. अलीकडे झरीन खानने (Zareen Khan) पुन्हा एकदा ट्रोलिंगला चांगलंच उत्तर दिलं आहे. "म्हातारी व्हायलीस लग्न कर", असं म्हणत नेटकऱ्यांनी तिचं ट्रोलिंग केलं होतं. आता झरीन खान (Zareen Khan) हिने एक व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. 

झरीन खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तिने “लग्न केल्याने सर्व समस्या सुटतात” या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ट्रोलची खिल्ली उडवत तिने विचारलं की, "लग्न केल्यावर मी परत तरुण होणार आहे का?" झरीन म्हणाली की, महिलांच्या स्वातंत्र्यावर कायमच धोका असल्यासारखं वागलं जातं आणि अनेक कुटुंबांमध्ये पहिलं उत्तर हेच असतं — "लग्न लावून टाका."

व्हिडीओमध्ये झरीन म्हणते, “अलीकडे मी माझ्या काही पोस्ट्सवरील कमेंट्स वाचल्या, त्यातली एक कमेंट खूप विचित्र वाटली – 'लग्न कर, म्हातारी होत चालली आहेस'. म्हणजे काय? लग्न केल्यावर मी पुन्हा तरुण होणार आहे का? याचा काय अर्थ आहे? मला माहित नाही. ही मानसिकता फक्त आपल्या देशात आहे की जगभरातच आहे, पण का कुणास ठाऊक, लग्नाला सगळ्या समस्यांचं उत्तर समजलं जातं.”

लग्नाबद्दल झरीन खानने काय म्हटलं?

ती पुढे म्हणते, “म्हणजे काय, हे कसं उत्तर असू शकतं? जो व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, त्याच्यावर तुम्ही अजून एका व्यक्तीची जबाबदारी देऊ इच्छिता? मग तो फक्त स्वतःचं नाही, तर त्या दुसऱ्या व्यक्तीचंही आयुष्य खराब करेल. त्यामुळे मला वाटतं ही पद्धत उपयोगाची नाही.”

समाजाच्या मानसिकतेवर झरीनचा टोला

झरीन खान पुढे बोलताना म्हणाली, “आपल्या समाजात एक विचार आहे. मुलगा हातातून निघून जातोय किंवा मुलगी नियंत्रणात नाहीय. हे ऐकून असं वाटलं की आई-वडिलांची पहिली चिंता म्हणजे लग्न. आणि उपायसुद्धा तोच – लग्न लावून टाका. लग्न काही जादू आहे का? की लग्न झालं की सगळं व्यवस्थित होईल? मला माहिती आहे की आजकाल बरीच लग्नं दोन-तीन महिनेही टिकत नाहीत. त्यामुळे मला अजिबात वाटत नाही की लग्न हे सर्व समस्यांचं उत्तर आहे.”

सलमान खानच्या चित्रपटातून कारकि‍र्दीला सुरुवात

झरीन खानने आपल्या करिअरची सुरुवात 2010 साली सलमान खानच्या वीर या चित्रपटातून केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. झरीनची कैटरीना कैफसोबत सातत्याने होत असलेली तुलना तिच्या करिअरवर नकारात्मक प्रभाव टाकणारी ठरली. तिला शेवटचं 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम भी अकेले तुम भी अकेले या चित्रपटात पाहण्यात आलं होतं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बॉर्डरमधील मधुचंद्राचं ते गाण कसं शूट करणार? याचं टेन्शन यायचं, सुनील शेट्टीचा मोठा खुलासा