YouTuber Gurman Singh Aka Road Safety Wala Crime: 'रोड सेफ्टी वाला' (Road Safety Wala) सोशल मीडिया हँडलर (Social Media) गुरमान सिंह (Gurman Singh) याला नुकतंच अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरमान सिंहवर (वय वर्ष 32) मुली किंवा महिलांना जाणीवपूर्वक वाहनाने टक्कर मारणे, पाठलाग करणे आणि अश्लील टिप्पणी करणे असा आरोप (Crime News) होता. इतकेच नाही तर, हा आरोपी महिलांचे व्हिडीओ तयार करुन परवानगीशिवाय अपलोड देखील करायचा. 'रोड सेफ्टी वाला' या नावाने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट आहे.
गुरमान सिंहला अटक, पोलिसांच्या कारवाईत अनेक माहिती उघड (Road Safety Wala Harrases Women)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2 जून 2026 रोजी उघडकीस आली होती. राजा गार्डनर येथील रहिवासी सनी अरोरा यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, मोटारसायकलवरील 2 तरुणांनी त्यांच्या अल्पवयीन मुलींचा पाठलाग केला. तसेच मुलींना धडक मारुन त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांना शिवीगाळ केली. यानंतर आपल्या मुलींचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड झाले असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं.
यानंतर सनी अरोरा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो अॅक्ट संबंधित कलामांनुसार, गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी गुरमान सिंहला अटक केली असून, त्याच्याकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून 'रोड सेफ्टी वाला' चं फेसबूक पेज आणि यूट्यूब अकाऊंटचं अॅक्सेस घेतले आहे.
अनेक डिजिटल पुरावे पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच पोलिसांनी या प्रकाराच्या संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरमान सिंह हा दिल्लीतील खालसा कॉलेज येथे ग्रॅज्युएशनचा अभ्यास करत होता. त्याच्या यूट्यूब चॅनलवर 21हजार फॉलोअर्स आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
