Yo Yo Honey Singh Birthday : आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) आज (15 मार्च) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. हिरदेश सिंहचा ‘यो यो हनी सिंह’ झाला आणि त्याने केवळ उत्तम गाणी गायली नाहीत, तर उत्तम संगीतही दिले. जन्म पंजाबचा असला तरी तो लहानाचा मोठा दिल्लीत झाला.


दिल्लीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हनी सिंहने संगीत शिकण्यासाठी लंडनमधील ट्रिनिटी कॉलेज केंब्रिजमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो बराच काळ कामाच्या शोधात इंग्लंडमध्ये भटकला. स्वतः हनी सिंहने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये याचा खुलासा केला आहे. याच दरम्यान एका रेकॉर्डिंगच्या निमित्ताने तो दिल्लीत आला होता. इथेच त्याला पहिली संधी संधी मिळाली आणि तो भारताचा ‘रॅप किंग’ बनला.


अशी मिळाली पहिली संधी!


भारतात रेकॉर्डिंग करत असताना एका पंजाबी गायकाशी त्याची भेट झाली. हनी कामाच्या शोधात असल्याचे कळताच त्यांनी त्याच्याकडून एक गाणे गाऊन घेतले. मात्र, नंतर हे गाणे त्यांना आवडले नाही आणि त्यांनी ते चित्रपटातून वगळले. यानंतर याच पंजाबी गायकाच्या निर्माता असलेल्या मुलाने हनीचा आवाज ऐकला आणि त्याचे गाणे चित्रपटासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे हनीने त्याचे पहिले पंजाबी रॅप गाणे गायले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.


अचानक मनोरंजनविश्वातून झाला गायब!


आपल्या गाण्यांनी आणि स्टाईलने नेहमी चर्चेत राहणारा हनी सिंह तब्बल 18 महिने कोणत्याही अल्बम किंवा चित्रपटातील गाण्यात दिसला नाही. यानंतर त्याच्या विषयी अनेक उलट-सुलट चर्चा झाल्या, त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केल्याचेही सांगण्यात आले. पण, हनी सिंहने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आणि त्यानंतर आपण या काळात बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त असल्याचे त्याने सांगितले.


हनी सिंहने गायलेली 'हाय मेरा दिल', 'ब्राउन रंग', 'हाय हील्स', 'ब्रेकअप पार्टी', 'ब्रिंग मी बॅक', 'ब्लू आईज', 'इसे कहते है हिप हॉप हिप हॉप', 'देसी कलाकार', ‘रानी तू मैं राजा', 'पार्टी ऑन माय माइंड', 'लुंगी डान्स', 'पार्टी ऑल नाइट', 'सनी सनी', 'चार बॉटल वोडका', 'पार्टी विथ भूतनाथ', 'आता माझी सटकली', 'बर्थडे बॅश' ही गाणी आजही सर्वांच्या प्लेलिस्टमध्ये दिसतील.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha