मुंबई : मूळ कलाकार आणि संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित यश राज फिल्म्सच्या (YRF) नव्या ‘राह रेकॉर्ड्स’ या संगीत लेबलच्या लॉन्चची घोषणा केल्यानंतर अवघ्या एका दिवसात लेबलने आपले पहिले मूळ गीत ‘जादूगरी’ प्रदर्शित केले आहे. गायक-गीतकार अमनने लिहिलेले आणि सादर केलेले हे गीत आहे. काल ‘राह रेकॉर्ड्स’च्या लॉन्चसोबत ‘जादूगरी’च्या भावविश्वाची झलक श्रोत्यांसमोर आणल्यानंतर आता हे गीत सर्व प्रमुख ऑडिओ स्ट्रीमिंग व्यासपीठांवर उपलब्ध झाले आहे.
प्रेम, विरह आणि नात्यातील शांत क्षणांचा भावस्पर्शी वेध
अमनने लिहिलेले आणि सादर केलेले ‘जादूगरी’ हे प्रेम, विरह आणि एखादी व्यक्ती दूर गेल्यानंतरच त्याची खरी किंमत जाणवणाऱ्या शांत क्षणांवर आधारित भावस्पर्शी गीत आहे. आपल्या जोडीदाराच्या प्रेमाला गृहीत धरल्याची जाणीव खूप उशिरा होणाऱ्या एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हे गीत मांडण्यात आले आहे. मनाला भिडणारे शब्द आणि भावपूर्ण चालीच्या माध्यमातून न बोललेले संवाद, कधीही व्यक्त न केलेली कृतज्ञता आणि दैनंदिन आयुष्यातील लहान-सहज क्षणांचे महत्त्व या गीतातून अधोरेखित करण्यात आले आहे.
पडद्यावर अमन आणि शिवांगी नेगी यांची केमिस्ट्री
या भावनांना पडद्यावर साकारताना संगीत व्हिडिओमध्ये अमनसोबत शिवांगी नेगी झळकत आहे. दोघांच्या नात्यातील आनंदी आठवणींना जिव्हाळ्याच्या प्रसंगांतून मांडण्यात आले आहे. त्यानंतर हळूहळू दोघांमधील वाढत जाणारे भावनिक अंतर समोर येते. ‘जादूगरी’ हे शीर्षक जोडीदाराच्या प्रेमातील त्या जादूचे प्रतीक आहे, ज्याची खरी जाणीव मुख्य व्यक्तिरेखेला ते प्रेम गमावल्यानंतर होते.
राह रेकॉर्ड्स आणि अमनची सर्जनशील भागीदारी
या रिलीजसोबत राह रेकॉर्ड्समधील अमनच्या प्रवासाचीही सुरुवात झाली आहे. लेबलच्या प्रतिभा-विकास उपक्रमांतर्गत गेल्या वर्षभरापासून अमनसोबत सातत्याने सर्जनशील पातळीवर काम करण्यात आले. या काळात त्याने आपल्या गीतलेखनाला अधिक परिष्कृत केले आणि संगीताची स्वतःची शैली विकसित केली. प्रत्येक कलाकाराला त्याची स्वतःची वेगळी ओळख आणि आवाज जपण्यासाठी सक्षम करण्याची राह रेकॉर्ड्सची बांधिलकी यातून अधोरेखित होते.
"जादूगरी हे अतिशय प्रामाणिक भावनेतून आलेले गीत"
‘जादूगरी’बद्दल बोलताना अमन म्हणाला, “जादूगरी हे अतिशय प्रामाणिक भावनेतून आलेले गीत आहे. हे अशा नात्याबद्दल आहे, यात नाते संपण्यापूर्वीच एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जात असल्याची जाणीव होते; मात्र तरीही आपण सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल अशी आशा ठेवत राहतो. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, त्यांना घट्ट धरून ठेवावं आणि त्यांच्या प्रेमाला कधीही गृहीत धरू नये, याची आठवण हे गीत करून देईल, अशी माझी आशा आहे.”
'रोया था' गीताच्या यशाने निर्माण केले स्थान
अमनने आपल्या अत्यंत वैयक्तिक आणि भावस्पर्शी गीतलेखनातून एक निष्ठावान प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेले त्याचे ‘रोया था’ हे गीत स्पॉटिफायवर जवळपास ५० लाख वेळा ऐकले गेले, स्पॉटिफाय इंडियाच्या व्हायरल चार्टमध्ये १३व्या क्रमांकावर पोहोचले आणि या गीतावर इन्स्टाग्रामवर १९ हजारांहून अधिक रील्स तयार करण्यात आल्या. ‘जादूगरी’च्या माध्यमातून अमन एका अत्यंत वैयक्तिक गीतासह आपल्या कारकिर्दीच्या नव्या अध्यायाला सुरुवात करत असून राह रेकॉर्ड्सच्या अंतर्गत संगीत प्रदर्शित करणारा तो पहिला कलाकार ठरला आहे.
ही बातमी वाचा:
