Box Office Collection: कन्नड अभिनेता यश सध्या 'रामायण' (रामायण) आणि 'टॉक्सिक' (Toxic) या दोन बिग बजेट चित्रपटांमुळे चर्चेत आहे. हे दोन्ही चित्रपट 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी आहेत. गेल्या चार वर्षांत यशचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्याने त्याच्या पुनरागमनाची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा आहे. निर्मात्यांनीही त्याच्यावर मोठा विश्वास दाखवत हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले असले तरी त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.यश अखेर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'KGF Chapter 2' मध्ये झळकला होता. त्यानंतर चार वर्षांनी तो पुन्हा मोठ्या पडद्यावर परतत असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Continues below advertisement

4000 कोटींचा 'रामायण'

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या महत्त्वाकांक्षी चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारत आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे. या चित्रपटाचं बजेट 4000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून प्रत्येक भागाचे बजेट सुमारे 2000 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. पहिला भाग दिवाळी 2026, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Continues below advertisement

'रामायण'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील VFX आणि वेशभूषेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्रेतायुगातील पात्रांचे पोशाख वास्तवाशी सुसंगत नसल्याची टीका करण्यात आली. तर दुसरीकडे अनेकांनी या चित्रपटाची ऑस्करपर्यंत मजल जाऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली आहे. यशच्या रावणाच्या भूमिकेकडून प्रेक्षक आणि निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

500 कोटींच्या 'टॉक्सिक'मध्ये झळकणार

यशचा दुसरा बहुचर्चित चित्रपट म्हणजे 'टॉक्सिक'. हा चित्रपट 26 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला तो 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र 'धुरंधर 2'च्या प्रदर्शनामुळे त्याची रिलीज पुढे ढकलण्यात आली. अहवालानुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 5oo कोटी रुपये आहे.

चित्रपटाचा टीझर आणि काही गाणी आधीच प्रदर्शित झाली आहेत. मात्र काही दृश्यांवर टीका झाली. विशेषतः चित्रपटात महिलांचे चित्रण 'शोपीस'सारखे करण्यात आल्याची टीका झाली असून काही आतील दृश्यांमुळेही वाद निर्माण झालेला. तरीदेखील निर्माते आणि चाहते या चित्रपटाकडून मोठ्या यशाची अपेक्षा करत आहेत. 'KGF' मालिकेप्रमाणेच हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटात यशसोबत नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, कियारा अडवाणी आणि रुक्मिणी वसंत या अभिनेत्री प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

'रामायण' आणि 'टॉक्सिक'वर टीकेची झोड

'रामायण' आणि 'टॉक्सिक' हे 226 मधील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांमध्ये गणले जात असले तरी त्यांच्या ट्रेलर आणि टीझरला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही चित्रपटांवर विविध कारणांमुळे टीका झाली असून त्याचा बॉक्स ऑफिसवरील कमाईवर परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'KGF 2'ने बॉक्स ऑफिस गाजवला होता

यश अखेर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'KGF Chapter 2' मध्ये दिसला होता. Sacnilk च्या माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 100 कोटी रुपये होते. भारतातील नेट कलेक्शन 859.70 कोटी रुपये, तर परदेशातील कमाई 214.15 कोटी रुपये झाली होती. चित्रपटाने जगभरात मिळून सुमारे 1215 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

यामुळे आता 'रामायण' आणि 'टॉक्सिक' या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून यश चार वर्षांनंतर पुन्हा बॉक्स ऑफिसवर तितकाच मोठा विक्रम करू शकतो का, याची उत्सुकता आहे.

4500 कोटींचा डाव यश यशस्वी करणार?

सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे निर्मात्यांनी यशवर 4500 कोटी रुपयांचा विश्वास ठेवला आहे. मात्र दोन्ही चित्रपटांवर विविध स्तरांवर टीका होत आहे. अनेकदा अशा टीकेचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही होताना दिसतो. त्यामुळे 'रामायण' आणि 'टॉक्सिक' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, यावरच यशच्या पुनरागमनाचे आणि या प्रचंड गुंतवणुकीचे यश अवलंबून असणार आहे. आता यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर इतिहास रचतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.