Harjit Singh Laddi BKI terrorist : सुप्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा याने कॅनडामध्ये नव्यानेच उघडलेल्या रेस्टॉरंटवर बुधवारी (दि.10) रात्री गोळीबार करण्यात आलाय. ब्रिटिश कोलंबियामधील सुरे (Surrey) येथे गोळीबाराची घटना घडली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कॅफेवर गोळ्या झाडल्या जात असल्याचे दिसते.
प्राथमिक माहितीनुसार, कॅफेवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, परंतु कोणतीही जखमी झाल्याची नोंद नाही. या हल्ल्याची जबाबदारी हरजीत सिंग लड्डीने घेतली असल्याचे सांगितले जात आहे. तो बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून NIA (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) च्या भारतातील सर्वाधिक वान्टेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे. कपिल शर्माच्या काही वक्तव्यांमुळे हा हल्ला करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
हरजीत सिंग लड्डी कोण आहे?
हरजीत सिंग लड्डी हा बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेचा परदेशस्थित महत्त्वाचा कार्यकर्ता आहे. तो सध्या जर्मनीमध्ये वास्तव्यास असल्याचे समजते आणि BKI च्या परदेशातील हालचालींचे समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
त्याच्यावर पंजाबमध्ये अनेक हिंसक हल्ल्यांचे आयोजन केल्याचा आरोप आहे. यात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांवर टार्गेटेड हल्ले तसेच एप्रिल 2024 मध्ये विश्व हिंदू परिषद (VHP) चे नेते विकास प्रभाकर यांची हत्या यांचा समावेश आहे. तो स्थानिक कार्यकर्त्यांची भरती, शस्त्रास्त्रे व दारुगोळा मिळवून देणे, तसेच आर्थिक आणि लॉजिस्टिक पाठबळ पुरविणे अशा कामांमध्ये सक्रिय आहे.
आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि नेतृत्व
पाकिस्तानस्थित BKI प्रमुख वधवा सिंग बब्बर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग म्हणून लड्डी पंजाबमध्ये अस्थिरता पसरवण्याचे काम करतो. जरी तो परदेशात राहत असला तरी भारतातील कार्यकर्त्यांवर त्याचे थेट नियंत्रण असल्याचे समजते.
भारत सरकार आणि NIA ने लड्डीला अत्यंत धोकादायक फरार म्हणून घोषित केले आहे. त्याला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, जे त्याच्या दहशतवादविरोधी कारवायांमधील महत्त्व अधोरेखित करते.
इतर महत्त्वाच्या बातम्या