Web Series mitti ek nayi pehchan : 'निर्मल पाठक की घर वापसी', 'पंचायत', 'सरपंच साहब' आणि 'ग्राम चिकित्सालय' या वेब सीरिजनी ग्रामीण भागातील पार्श्वभूमीवरील कंटेंटला प्रोत्साहन दिलं आहे. गेल्या काही वर्षांत अशा अनेक फिल्म्स आणि सीरिज आल्या आहेत ज्यात गावांच्या अज्ञात पैलूंचं, संस्कृतीचं आणि समाजाचं चित्रण करण्यात आलं आहे.

ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित 'निर्मल पाठक की घर वापसी', 'पंचायत', 'सरपंच साहब' आणि 'ग्राम चिकित्सालय'नंतर आणखी एक वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या सीरिजला IMDb वर 8.5 इतकी रेटिंग मिळाली आहे. यात एक ग्रामपंचायतचा सरपंच, बँकेचा कर्मचारी आणि शहरातून आलेल्या एका तरुणामध्ये संघर्ष दाखवला आहे, जो आपल्या आजोबांच्या अपमानाचा बदला घेतो.

8.5 IMDb रेटिंग असलेल्या या सीरिजचं नाव आहे – ‘मिट्टी: एक नई पहचान’. ही सीरिज 11 जुलै रोजी रिलीज झाली असून यामध्ये इश्वाक सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीत तयार झालेली ही मालिका गावातील सामाजिक समस्या, शेतकऱ्यांचं कर्ज आणि शेती यांचं वास्तव समोर आणते.

इश्वाक सिंह यांनी या सिरीजमध्ये राघव शर्मा ही भूमिका केली आहे. तो एका पीआर एजन्सीसाठी जाहिराती लिहितो. यशस्वी करिअर असूनही तो सर्व काही सोडून आपल्या गावात परततो आणि तिथेच राहण्याचा निर्णय घेतो.

‘मिट्टी: एक नई पहचान’ ची सुरुवात होते राघवच्या ऑफिसपासून, जिथे त्याचं काम कौतुकास्पद ठरतं. तेवढ्यात त्याच्या वडिलांचा कॉल येतो आणि ते सांगतात की त्याच्या आजोबांचं निधन झालं आहे. तो त्यांच्या अंतिम संस्कारासाठी गावात येतो.

गावात आल्यावर राघवला समजतं की त्याच्या आजोबांनी 15 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यांनी आधुनिक शेती करण्यासाठी हे कर्ज घेतलं होतं, पण त्यात ते यशस्वी ठरले नाहीत आणि शेवटी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू होतो.

बँकेचा एक कर्मचारी वारंवार कर्ज भरण्यासाठी त्रास देत असतो. राघव बँकेत जाऊन कर्ज फेडण्याचा निर्णय घेतो, पण बँकेचा मॅनेजर त्याच्या आजोबांबद्दल वाईट बोलतो. त्यामुळे राघव ठरवतो की तो आधुनिक शेती करूनच पैसे कमावेल आणि तेव्हाच कर्ज फेडेल.

गावचा सरपंच राघवला बाहेरचा समजतो आणि त्याच्या आधुनिक शेतीचा उपहास करतो. राघव त्यांना उत्तर देण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आधुनिक शेती सुरू करतो. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एका महिला कृषी अधिकाऱ्याची त्याला मदत मिळते.

राघव गुलाबाच्या फुलांची शेती सुरू करतो. पण सुरुवातीलाच जास्त पावसामुळे त्याचे नुकसान होते. तो हार मानत नाही. पण दुसऱ्यांदा टोळधाडीमुळे पिकं पुन्हा खराब होतात.

राघव तरीही धैर्य सोडत नाही. अखेर त्याच्या शेतात गुलाब उमलू लागतात. पण आता विक्रीचा प्रश्न उभा राहतो. गावच्या बाजारात त्याला योग्य किंमत मिळत नाही आणि तो पुन्हा निराश होतो. गुलाब सुकायला लागतात.

पुढे काय घडतं? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ‘मिट्टी: एक नई पहचान’ ही वेब सीरिज अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत पाहू शकता.