Musafir Cafe in Real Life: नेटफ्लिक्सवरील 'मुसाफिर कॅफे' ही वेबसिरीज रिलीज झाल्यापासून विक्रांत मॅसीच्या अभिनयाइतकीच आणखी एका गोष्टीची चर्चा रंगली आहे... ती म्हणजे वेबसिरीजमध्ये दिसणारं निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुंदर 'मुसाफिर कॅफे'ची.. धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईने नटलेला परिसर आणि शांत वातावरण पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे खऱ्या आयुष्यात खरंच हा कॅफे आहे का?
वेबसिरीजमध्ये दिसणारा 'मुसाफिर कॅफे' खास शूटिंगसाठी उभारलेला सेट आहे. पण ज्या ठिकाणी या वेबसिरीजचं शूटिंग झालं, ती जागा मात्र अगदी खरी असून उत्तराखंडमधील मसुरी येथे आहे.
मसुरीतील 'झरीपाणी कॅसल'मध्ये झालं शूटिंग
'मुसाफिर कॅफे'चं शूटिंग मसुरीमधील झरीपाणी कॅसल (Jharipani Castle) या हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये करण्यात आलं आहे. लाकडी कॉटेज, हिरव्या रंगाची छप्परं, बोगनवेलींनी सजलेल्या भिंती, रंगीबेरंगी प्रेयर फ्लॅग्स, दरीकडे उघडणारे व्ह्यू आणि निसर्गरम्य पायवाटा... हे सगळं पाहिलं की इथून परतावंसंच वाटत नाही.
वेबसिरीजमध्ये दिसणाऱ्या पायऱ्या, टेरेस, बागेतील वाटा आणि ओपन स्पेस आजही तशाच आहेत. त्यामुळे वेबसिरीज पाहिल्यानंतर इथे गेलेल्या पर्यटकांना पडद्यावर पाहिलेल्या जागा प्रत्यक्ष अनुभवता येतात.
नोव्हेंबर 2025 मध्ये इथे या वेबसिरीजचं शूटिंग करण्यात आलं. याच काळात दून व्हॅलीतील प्रसिद्ध 'विंटर लाईन' आणि संध्याकाळचा सोनेरी प्रकाश संपूर्ण परिसराला वेगळीच जादू देतो. वेबसिरीजमध्ये दिसणारी दृश्यं प्रत्यक्षातही तितकीच सुंदर आहेत.
काचेच्या भिंतीतून दिसणारे डोंगर, हिरवीगार बाग, दरीकडे तोंड करून तयार केलेली बसण्याची जागा आणि ढग अगदी पायाखाली असल्याचा अनुभव... त्यामुळे हे ठिकाण सोशल मीडियावरही अनेकांचं फेव्हरेट बनलं आहे.
तुम्हीही घेऊ शकता 'मुसाफिर कॅफे'चा अनुभव
जर तुम्हालाही या वेबसिरीजसारखा अनुभव घ्यायचा असेल, तर मसुरीतील झरीपाणी कॅसलला भेट देता येईल. ही प्रॉपर्टी ओक ग्रोव्ह स्कूलजवळ, पाटियाला हाऊस, एसबीआयसमोर, झरीपाणी, मसुरी येथे असून देहरादूनपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगितलं जातंय..
वेबसिरीजमध्ये दिसणारं 'मुसाफिर कॅफे' प्रत्यक्षात नसला तरी झरीपाणी कॅसलमध्ये गेल्यावर त्याच वातावरणाचा अनुभव नक्की घेता येतो. म्हणूनच ही वेबसिरीज पाहिल्यानंतर अनेकजण आता मसुरीतील या ठिकाणाला आपल्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये ॲड करत आहेत.
