Rashtra Movie Trailer : सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि देशप्रेमाने प्रेरित होऊन साजरा केला जात आहे. नेत्रदीपक अशा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर प्रदर्शित होणारा 'राष्ट्र' (Rashtra) हा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत जागवणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


'राष्ट्र'चा ट्रेलर खऱ्या अर्थानं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. आज आपण देश स्वातंत्र्य झाल्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही समाजातील जाती-पातीची दरी मिटलेली नाही. उच्च-नीच, दलित-सवर्ण यांच्या नावाखाली आजही राजकारण खेळलं जात असल्याचं चित्रण 'राष्ट्र'मध्ये करण्यात आल्याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. आमच्या राज्यामध्ये पोलिसांना काहीही काम नाही, कारण गुन्हे आम्ही घडवू देत नाही, हे संवाद उत्सुकता वाढवतात. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर विचारवंतांचे विचारही या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा प्रकाशझोतात येणार आहेत. दमदार संवाद, आघाडीच्या कलाकारांची जुगलबंदी, प्रभावी वैचारीक संघर्ष, अर्थपूर्ण गाणी, मंत्रमुग्ध करणारं संगीत आणि वर्तमान काळातील समाजाला आरसा दाखवणारं कथानक ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं.


पाहा ट्रेलर :



रामदास आठवले आणि राजू शेट्टीही महत्त्वपूर्ण भूमिकेत!


इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली निर्माते बंटी सिंह यांनी 'राष्ट्र' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक इंदरपाल सिंह यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. विक्रम गोखलेंसारखे दिग्गज अभिनेते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यात दिसणार आहेत. दिग्दर्शक इंदरपाल यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट समाजातील अतिशय ज्वलंत मुद्द्याला हात घालण्याचं काम करतो. समाजातील प्रत्येक घटकाचे म्हणणे मांडतो आणि त्यातून कशाप्रकारे मार्ग काढायला हवा हे देखील सांगतो. वास्तवातील राजकीय पटलावरील काही घडामोडी सिनेपटलावर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अर्थपूर्ण संवाद आणि गीत-संगीताच्या माध्यमातून वास्तव मांडणारा 'राष्ट्र' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही इंदरपाल म्हणाले.


दिग्गज कलाकारांची फौज


'राष्ट्र' या चित्रपटाद्वारे मराठी सिनेदिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या इंदरपाल यांनी समाजाला नवी दिशा देणारा चित्रपट बनवला आहे. यात त्यांनी आरक्षणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे. विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव आदी कलाकार या चित्रपटात आहेत. संगीतकार निखिल कामत आणि इंदरपाल सिंह यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.


हेही वाचा :


Rashtra movie : 'राष्ट्र' चित्रपट 26 ऑगस्ट रोजी होणार रिलीज; रामदास आठवले आणि राजू शेट्टी झळकणार रुपेरी पडद्यावर