Vijayi Bhav Trailer : 'विजय भव' (Vijayi Bhav) हे केवळ दोन शब्द प्रचंड उर्जा आणि विजयी होण्यासाठी शक्ती देणारे आहेत. यशाचा हाच गुरुमंत्र आता रसिकांना मोठया पडद्यावर चित्रपटाच्या रूपात पहायला मिळणार आहे. खेळाची राजकारणाशी सांगड घालून गुंफण्यात आलेली कथा 'विजय भव' या आगामी चित्रपटात आहे. या चित्रपटाचा लक्ष वेधून घेणारा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. टायटलमुळे चर्चेत आलेल्या या चित्रपटात काय पहायला मिळणार याची झलक ट्रेलरमध्ये असल्यानं अत्यंत कमी वेळात 'विजय भव'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
स्वास्तिक मोशन पिक्चर्स प्रोडक्शनची निर्मिती आणि केनिल एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या 'विजयी भव' या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती किर्तन गोर्धनभाई पटेल आणि जगदीश एम. पवार यांनी केली आहे. शैलेश पटेल आणि अतुल सोनार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. इंडियन आयडल फेम जगदीश चव्हाण या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची बातमी आल्यानंतर लगेचच ट्रेलर लाँचच्या माध्यमातून 'विजय भव'ची झलक पहायला मिळाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात कबड्डीवर आधारलेलं कथानक असलं तरी कबड्डीचा हा डाव राजकारणाच्या पटलावर रंगलेला पहायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळतात. खेळ, प्रेमकथा, राजकारण, नातेसंबंध, मैत्री अशा विविध माध्यमांतून 'विजय भव'चं कथानक उलगडत जाणार आहे. प्रवाहापेक्षा काहीशा वेगळ्या कथानकावर आधारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल अशी प्रतिक्रीया शैलेश पटेल आणि अतुल सोनार या दिग्दर्शक द्वयींनी दिली आहे. कथानकापासून अभिनयापर्यंत आणि गीत-संगीतापासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाबतीत हा चित्रपट रसिकांचं पूर्ण मनोरंजन करणारा असून, अखेरपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा असल्याची भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. 'विजय भव'च्या ट्रेलरला मिळत असलेला प्रतिसाद याची साक्ष देण्यासाठी पुरेशी आहे.
जगदीश सोबत या चित्रपटात पूजा जैसवाल मुख्य भूमिकेत असून, सोनाली दळवी, विनायक केतकर, जगदीश पवार, विक्रम मेहता आदी कलाकारांनीही विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. जगदीश पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, अतुल सोनार यांनी पटकथालेखन केलं आहे. संवादलेखनाची जबाबदारी मुकुंद महाले यांनी अतुल सोनार यांच्या साथीनं सांभाळली आहे. सिनेमॅटोग्राफी लालजी बेलदार यांनी केली असून, कोरिओग्राफी विक्रांत देव, नॅाडी रसाळ, राम देवन, दीपक तुरी यांनी कोरिओग्राफी केली आहे. संकलन धर्मेश चांचडीया यांनी केलं आहे, तर पार्श्वसंगीत स्वप्नील नंगी यांनी दिलं आहे. विरेंद्र रत्ने यांनी लिहिलेल्या गीतरचना संगीतकार कबीर शाक्या यांनी जगदीश चव्हाण, कविता राम, मंजिमा गोस्वामी, वैशाली माडे, नूरा सिंग आडे, स्वप्नाली चौहान यांच्या सुमधूर आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत. किशोर संगानी आणि सुरेश पाटील या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर्स आहेत. कश्मीरानं कॅास्च्युम डिझाईन आणि हमजा दागीनावाला यांनी साऊंड डिझाईंनींग केलं आहे. फाईटींग सिक्वेन्स फाईट मास्टर परवेझ आणि शहाबुद्दीन यांनी केले आहेत. संपत आणि अश्विन या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट २० मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
हेही वाचा :