DID Lil Masters : ‘डान्स इंडिया डान्स’ (DID Lil Masters) या टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी शोमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगांव गावचा सुपुत्र विघ्नेश साळुंखे (Vignesh Salunke) आणि त्याच्या उंदीर मामानं कल्ला केलाय. उंदीर मामा आणि त्याचं बाँडिंग, तसेच आपल्या अदाकारीन त्यांने परीक्षकांसह प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सिंधुदुर्गासह संपूर्ण महाराष्ट्रात तुफान व्हायरल होत आहे.


‘डान्स इंडिया डान्स’ अर्थात ‘डीआयडी’ हा सुप्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो आहे. हा भारतीय टेलिव्हिजन उद्योगातील सर्वात यशस्वी नृत्य रिअ‍ॅलिटी शो आहे, जो झी टीव्ही या चॅनेलवर प्रसारित केला जातो. त्यात ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर्स’चा हा एक विशेष सीझन आहे. 5 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा शो स्पर्धात्मक व्यासपीठ प्रदान करतो.


परीक्षकांनाही झाला उंदीर मामाला भेटण्याचा मोह!


यावर्षी झी टीव्ही वाहिनी आपल्या दर्शकांसाठी DID Lil Masters चा पाचवा सीझन घेऊन आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिमुकला विघ्नेश साळुंखे सहभागी झाला आहे. त्यात या चिमुकल्याचा आणि त्याच्या उंदीर मामाचा दोस्ताना चांगलाच भाव खावून गेला. या दोघांच्या केमेस्ट्रीनंतर विघ्नेशने नृत्याविष्कार सादर करत केलेल्या कल्ल्यामुळे DID चा मंच त्याने गाजवलाय.


बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, ग्रँड मास्टर रेमो डिसूझा, अभिनेत्री मौनी रॉय यांनी त्याच्या या कलाकृतीचे तोंडभरून कौतुक करत, त्याची सीझनमध्ये निवड केली आहे. तर, त्याच्या उंदीर मामाला भेटण्याचा मोह सोनाली बेंद्रे, रेमो डिसूझा, मौनी रॉय यांना आवरता आला नाही.


पाहा व्हिडीओ :



कोकणाशी नाळ जुळलेला विघ्नेशचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विघ्नेश हा मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दत्त प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी माणगांव गावचा सुपुत्र. माणगांव मधील ढोलकरवाडी इथला असून, सध्या तो चिंचवड- पुणे इथं वास्तव्यास आहे. त्याची आई पुर्वा आणि वडील प्रकाश यांचा त्याला डान्ससाठी नेहमी सपोर्ट असतो. पुणे येथील कोरिओग्राफर धनराज ननवरे यांच्याकडे तो डान्सच शिक्षण घेत आहे. अगदी लहानपणापासून त्याला प्राण्यांची आवड आहे. यातूनच त्याची उंदीर मामाशी गट्टी जमली.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha