मुंबई : अभिनेत्री विद्या बालन ही कायमच वेगळ्या धाटणीच्या आणि चौकटीबाहेरील भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. नुकताच प्रदर्शित झालेल्या शेरणी चित्रपटानंतर विद्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. आता तर विद्याला  ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अ‍ॅण्ड आर्ट सायन्सने आपल्या समिती मध्ये सामील केले आहे, त्यामुळे विद्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे. विद्याबरोबर निर्माता एकता कपूर आणि शोभा कपूरला देखील ऑस्करतर्फे आमंत्रण मिळाले आहे. 


विशेष म्हणजे जगभरातून 395 कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रपट सृष्टीशी जोडलेल्यांना यामध्ये सामील करण्यात आले आहे. भारताकडून विद्या बालन ही एकमेव कलाकार आहे जिला अॅकडमीने आपल्या गवर्निंग बॉडीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. विद्याला आता अॅकडमीतर्फे निवडण्यात आलेल्या चित्रपटांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. अॅकडमीने गवर्निंग बॉडीमध्ये विद्याला सामील केले आहे. विद्याच्या नावासमोर कहानी आणि तुम्हारी सुल्लु या विद्याच्या गाजलेल्या चित्रपटांचे नाव लिहण्यात आले आहे.


2016 साली जगातून 928 जणांना कमिटीमध्ये सामील होण्याचे आमंत्रण पाठवले होते. यामध्ये भारतातून शाहरुख खान,  दिवंगत सौमित्र चॅटर्जी, तब्बू, आदित्य चोप्रा, नसरुद्दीन शाह, डॉली आहलूवालिया, बल्लू सलूजा, अनिल मेहता, मेहदाबी मुखर्जी यांना आमंत्रीत करण्याच आले होते. 2020 च्या ऑस्कर कमिटीमध्ये फिल्ममेकर आणि टेक्नीशीअनला सहभागासाठी आमंत्रण दिले होते.


विशेष म्हणजे ही बातमी समोर आल्यानंतर एबीपी न्यूजने विद्या बालन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला. परंतु त्यावेळी विद्याची प्रतिक्रिया मिळाली नाही. ड्रीम गर्ल’ आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटासाठी एकता कपूरची तर तिची आई शोभा कपूरची उडता पंजाब आणि द डर्टी पिक्चर चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अ‍ॅण्ड आर्ट सायन्स या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी ऑस्कर पुरस्कारांकडे संपूर्ण जगातल्या सिनेविश्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. जगभरातले उत्तमोत्तम सिनेमे या स्पर्धेत येतात आणि त्यातून ज्युरी उत्तम सिनेमे निवडतात. वेगवेगळ्या विभागांत उत्तम सिनेमांची निर्मिती होते.