TP Madhavan Passes Away : मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता टीपी माधवन यांचं निधन झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता टीपी माधवन यांचं गंभीर आजारानं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी कोल्लममधील एका खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं.
अभिनेता टीपी माधवन यांचं निधन
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता टीपी माधवन यांना पोटासंबंधित आजार होता. त्यांच्यावर रुग्णालयात पोटासंबंधित आजारावर उपचार सुरु होते. रिपोर्ट्सनुसार, पोटाशी संबंधित आजारामुळे माधवन व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर बुधवारी त्यांचं निधन झालं. गुरुवारी, 10 ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरम येथील शांती कवादम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आजारपणानंतर अभिनयापासून दूर
टीपी माधवन यांच्या पश्चात त्यांचा मुलगा राजा कृष्ण मेनन आणि मुलगी देविका असा परिवार आहे. अभिनेता टीपी माधवन त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये पठानापुरम येथील गांधी भवनात वास्तव्यास होते. काही वर्षांपूर्वी माधवन यांना स्मृतिभ्रंश झाल्याचं निदान झाल्यानं त्यांनी अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा मोठा निर्णय घेतला. 2015 पासून त्यांच्यावर स्ट्रोकचा उपचारही सुरू होता.
600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम
रिपोर्ट्सनुसार, टीपी माधवन यांचे वडील प्रसिद्ध प्रोफेसर एनपी पिल्लई हे होते. त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती. अभिनय कारकिर्दीपूर्वी त्यांनी कोलकाता आणि मुंबई येथे जाहिरात व्यवसाय चालवला. या अभिनेत्याने वयाच्या 40 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. 1975 मध्ये रागम या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. टीपी माधवन यांनी यशस्वी कारकिर्दी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. माधवन यांनी खलनायक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, पण नंतर त्यांनी कॉमेडी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :