Veteran Actor Deb Mukerjee Passes Away: काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukharjee) या दोन सुप्रसिद्धी अभिनेत्रींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काजोल आणि राणीचे काका आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील, ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचं निधन झालं आहे. दिग्गज अभिनेते देब मुखर्जी यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ऐन धुळवडीच्या दिवशी अयान मुखर्जीवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुखर्जी कुटुंबियांच्या निकटवर्तींयांनी दिलेल्या माहितीनुसार, देव मुखर्जी यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. काजोल आणि राणी मुखर्जी दोघीही देब मुखर्जी यांच्या अत्यंत जवळ होत्या. दरम्यान, देब मुखर्जी हे आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांचे सासरे देखील आहेत.
देब मुखर्जींना अंतिम निरोप देण्यासाठी दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती
देब मुखर्जी यांच्यावर धुळवडीच्या दिवशी म्हणजेच, 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता जुहू येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. देब मुखर्जींना अंतिम निरोप देण्यासाठी काजोल, अजय देवगण, राणी मुखर्जी, तनुजा, तनिषा, आदित्य चोप्रा, आशुतोष गोवारीकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य अंत्यसंस्काराला उपस्थित होते. आलिया भट्टच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी रणबीरनं खास प्लॅन केला होता. पण, देब मुखर्जींच्या निधनाची माहिती मिळताच आलिया आणि रणबीर सेलिब्रेशन सोडून अंत्यसंस्काराल उपस्थित होते. देब मुखर्जी प्रसिद्ध समर्थ-मुखर्जी परिवारातील सदस्य होते. त्यांच्या अत्यंसंस्कारासाठी इतरही अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.
60च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते देब मुखर्जी
दिग्गज अभिनेते देह मुखर्जी यांनी 60च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवली होती. 60 च्या दशकातील 'तू ही मेरी जिंदगी' आणि 'अभिनेत्री' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'दो आँखे' आणि 'बातो बातों में' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्येही काम केलं. पण, देब यांना त्यांचाच भाऊ जॉयसारखं सिनेसृष्टीत यश मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. त्यांच्या कारकिर्दीत नंतर त्यांनी 'जो जीता वही सिकंदर' आणि 'किंग अंकल' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. 2009 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' या चित्रपटात ते शेवटी रुपेरी पडद्यावर झळकले होते.
काजोलचे सख्खे काका देब मुखर्जी
दरम्यान, निर्माता सशाधर मुखर्जी हे काजोलचे आजोबा होते आणि त्यांचा मोठा मुलगा शोमू मुखर्जी, काजोलचे वडील. देब मुखर्जी, जॉय मुखर्जी, रोनो मुखर्जी आणि सुब्बीर मुखर्जी हे अभिनेत्री काजोलचे सख्खे काका. 1941 मध्ये कानपूर येथे जन्मलेले देब मुखर्जी एका प्रतिष्ठित आणि यशस्वी चित्रपट कुटुंबातील एक होते. त्यांची आई सतीदेवी ही अशोक कुमार, अनूप कुमार आणि किशोर कुमार यांची एकुलती एक बहीण होती. त्यांच्या भावंडांमध्ये यशस्वी अभिनेता जॉय मुखर्जी आणि चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांचा समावेश होता, ज्यांनी बॉलिवूड स्टार तनुजाशी लग्न केलं होतं. काजोल आणि राणी मुखर्जी या त्यांच्या सख्या पुतण्या. देब मुखर्जी यांचं दोनदा लग्न झालं होतं. त्यांच्या पहिल्या लग्नातील मुलगी सुनीता हिचं लग्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी झालं आहे. अयान हा त्यांचा दुसऱ्या लग्नापासून झालेला मुलगा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :