Urmila Kothare Car Accident Update: प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या (Urmila Kothare) गाडीला काही दिवसांपूर्वी भीषण अपघात (Accident) झाला होता. उर्मिलानं गाडीनं दोन मजुरांना उडवलं होतं. ज्यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाला त्यावेळी उर्मिला आणि गाडीचा चालक जखमी झाले होते. या अपघातात तिला देखील गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता याप्रकरणी उर्मिलाच्या गाडीच्या चालकाला अटक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ उर्मिलाच्या गाडीला भीषण अपघात झाला.                                                                 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात शुक्रवारी मध्यरात्री 12.54 च्या सुमारास झाला. उर्मिला आपल्या मैत्रिणीला भेटून घरी परतत होती, त्यावेळी हा अपघात झाला. यापूर्वी गाडीत मागे सीटवर बसलेल्या मैत्रिणीला उर्मिलानं जोगेश्वरीला सोडलं. त्यानंतर ठाणे-घोडबंदर मार्गानं ती घरी जात होती. त्याचवेळी उर्मिलाची गाडी कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ पोहोचली आणि चालक गजानन पालचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं.  


वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, "चौकशीदरम्यान चालक आणि अभिनेत्रीनं सांगितलं की, एका वाहन चालकानं भरधाव वेगात येऊन त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं. त्यामुळे त्या गाडीला धडकू नये म्हणून उर्मिलाचा चालक प्रयत्न करत असतानाच गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी उलटली. त्यानंतर गाडी एका बॅरिकेडला आदळली. त्यामुळे पुढे जाऊन गाडीनं मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं. यात सम्राटदास जितेंद्र नावाच्या मजुराचा मृत्यू झाला, तर सुजन रविदास जखमी झाला. तसंच गाडीत असलेल्या उर्मिला देखील गंभीर जखमी झाली आहे."


अपघात प्रकरणी गुन्हा दाखल 


उर्मिला कोठारेच्या गाडीनं झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार, चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय अपघातग्रस्त गाडी जप्त केली आहे. अपघाताच्या वेळी चालक दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही? याचा तपास करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले आहेत. या भीषण अपघातामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.