Huppa Huiya 2 Upcoming Marathi Movie: 'हुप्पा हुय्या' (Huppa Huiya) म्हटलं की, 'जय बजरंगा', अशी गर्जना आपसूकच तोंडून निघते. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या 'हुप्पा हुय्या' चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'हुप्पा हुय्या 2' ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

Continues below advertisement


पहिल्या भागातील दमदार कथेनं आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापरानं प्रेक्षकांना भूरळ घातली होती. मारुतीरायानं दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे आणि हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड  यांचा 'हुप्पा हुय्या 2' रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्यदिव्य आणि स्टायलिश ट्रीटमेंटनं  सज्ज होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाचं काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावं जाहीर केली जाणार आहेत. पहिल्या पार्टमध्ये सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत होता. आता दुसऱ्या पार्टमध्येही सिद्धार्थ जाधव नव्या अंदाजात दिसणार की, सिद्धार्थला कुणी रिप्लेस करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.                          


दिग्दर्शक समित कक्कड यांनी 'हुप्पा हुय्या 2'बाबत बोलताना सांगितलं की, "हुप्पा हुय्या 2' हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल, असा विश्वास मला आहे. आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कटतेनं आणि भव्यदिव्य पद्धतीनं साकारणार आहोत."   


रानटी, हाफ तिकीट, धारावी बँक, इंदोरी इश्क, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण या सारख्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचं  दिग्दर्शन करणाऱ्या समित कक्कड यांच्यासारखा कल्पक आणि सिनेमाच्या तंत्रावर भक्कम पकड असलेला दिग्दर्शक याही चित्रपटाला कलात्मकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेईल यात शंका नाही.  समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या 2’ ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड हे करीत असून, संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे तर लेखन हृषिकेश कोळी यांचं आहे.


दरम्यान, 'संकटात धैर्य, संघर्षात साहस आणि विजयात विनम्रता शिका', अशी मारुतीरायाची शिकवण मानणाऱ्या 'हुप्पा हुय्या 2'च्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Manala Lighting Song: महाराष्ट्राच्या प्रत्येक 'मनाला लायटिंग' करत आनंद देणारं मराठी लव्हसॉन्ग; तुम्ही ऐकलंय?