Upasana Singh Shares Casting Couch Experience: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) दूरून जेवढी ग्लॅमरस दिसते, जवळून तेवढीच भयानक घटनांनी भरलेली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजवर अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी हे गूढ सर्वांसमोर मांडून आपलं दुःख हलकं केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे, कास्टिंग काऊच. भारतीय चित्रपटसृष्टी असो किंवा हॉलिवूड, ग्लॅमरच्या जगात कास्टिंग काऊचला बळी पडणं, ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. जर तुम्ही बॉलिवूडमध्ये पाय रोवलेल्या बड्या कुटुंबातून आला नसाल तर, तुम्हाला अभिनेत्री होण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. 


अनेक बड्या अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचंच वास्तव सर्वांसमोर आणत आपल्या आसवांचा बांध मोकळा केला आहे. आज आपण अशाच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिनं कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या माध्यमातून सर्वांना खळखळवून हसवलं. याव्यतिरिक्त तिनं अनेक उत्कृष्ट सिनेमेदेखील दिले आहेत. पण एकदा तिनं दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा विचार केला, तेव्हा मात्र तिला आलेल्या अनुभवानं तिला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का दिला. चित्रपट मिळाला, मात्र चित्रपट निर्मात्यानं तिच्याकडे जी मागणी केली, त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन पुरती हादरली होती. एका मुलाखतीत बोलताना उपासना सिंहनं (Upasana Singh) तिच्यासोबतची आपबीती सांगत आसवांना वाट मोकळी करून दिली. 


अभिनेत्री उपासना सिंहनं आजवर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. जुडवा, मैं प्रेम की दिवानी हूं, जुदाई आणि कॉमेडी नाईट्स विथ कपिल मधील तिच्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी उपासना सिंह ओळखली जाते. ती दुसरी, तिसरी कोणी नसून तुम्हा-आम्हा सर्वांना परिचित असलेली कपिल शर्माची रील लाईफ बुआ म्हणूनही प्रसिद्ध आहे.




एका मुलाखतीत बोलताना उपसाना सिंहनं आपल्यासोबतचा अत्यंत भयानग अनुभव शेअर केला होता. तिनं तिच्या कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या काळातील एका अतिशय त्रासदायक आणि वेदनादायक अनुभवाबद्दल सांगितलं होतं. सिद्धार्थ कन्ननशी झालेल्या गप्पांमध्ये तिनं एका मोठ्या दक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शकाशी झालेल्या एका अस्वस्थ करणाऱ्या भेटीचा उलगडा केला, ज्यामुळे संपूर्ण चित्रपट उद्योगाबद्दलचा तिचा दृष्टिकोन कायमचा बदलला, असंही तिनं सांगितलं. 


दिग्दर्शकानं तिला... 


उपासना सिंहनं सांगितलं की, तिला त्यावेळी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शकानं बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरसोबत एका फिल्मसाठी साईन केलं होतं. त्यावेळी ती मिळालेल्या मोठ्या संधीसाठी खूपच एक्सायटेड होती. उपासनानं सांगितलं की, तिनं फिल्म इंडस्ट्रीच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, त्यामुळे ती नेहमीच सावध पावलं टाकायची. ती ज्या-ज्या वेळी एखाद्या दिग्दर्शकाच्या किंवा निर्मात्याच्या ऑफिसमध्ये जायची, त्या-त्या वेळी ती आपल्या आईला किंवा बहिणीला सोबत घेऊन जायची. तेव्हा तिची ही गोष्टी एका दिग्दर्शकाच्या लक्षात आली आणि त्यानं तिला याबाबत विचारलं. 


दिग्दर्शकानं उपासना सिंहला विचारलं की, तू नेहमी कुटुंबाच्या सदस्याला सोबत घेऊन का येतेस? त्यांनी असं विचारलेलं अभिनेत्रीला फारसं रूचलं नाही. उपासना सिंहनं सांगितलं की, त्यानंतर एक दिवस दिग्दर्शकानं रात्री 11:30 वाजता फोन केला आणि तिला एका हॉटेलमध्ये सिटिंगसाठी बोलावलं. फोनवर बोलल्यानंतर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ती म्हणाली की, पुढच्या दिवसाच्या शुटिंगची स्क्रिप्ट सांगणार आहे का? कारण माझ्याकडे हॉटेलपर्यंत येण्यासाठी गाडी नाही. अभिनेत्रीचं बोलणं ऐकून दिग्दर्शक म्हणाला की, तुला सिटिंगचा अर्थ बहुतेक माहिती नाही? या प्रश्नानंतर अभिनेत्री काहीशी घाबरली. तरीसुद्धा ती नाईलाजानं दिग्दर्शकासोबत गेली. 


त्या दिवशी रात्रभर... : उपासना सिंह 


त्या दिवशी रात्रभर अभिनेत्री फक्त रडत होती आणि ती पुढच्या दिवशी मनात नसतानाही दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये गेली. जेव्हा ती तिथे पोहोचली, तेव्हा दिग्दर्शकाची इतर लोकांसोबत मिटिंग सुरू होती. दिग्दर्शकाच्या ऑफिसमधल्यांनी तिला बाहेर वाट पाहायला सांगितलं. त्यावेळी तिला राग अनावर झाला होता. तिनं कुणाचंही न ऐकता थेट मिटिंग रुममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शकाला तिनं सर्वांसमोर खूप ऐकवलं. त्याला पंजाबीमध्ये शिवीगाळ केली.  


उपासना ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर आलं. दरम्यान, तिनं एक स्टँड घेतला होता, पण ती पश्चातापाच्या भावनेतून बाहेर येऊ शकली नाही. अभिनेत्रीनं सांगितलं की, ज्यावेळी मी तिच्या ऑफिसातून बाहेर आली, त्यावेळी मला लक्षात आलं की, मी अनेकांना सांगितलेलं की, तिनं सुपरस्टार अनिल कपूरसोबत फिल्म साईन केली आहे. मी फुटपाथवर एकट्यानंच चालत राहिले आणि ढसाढसा रडत होते.