Twinkle Khanna Talks About Menopause Journey: अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखली जाते. तिचं कायम मनातलं ओठांवर असतं. तिनं दिलेली मुलाखत असो किंवा तिचे व्हिडिओ, ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अलिकडेच अभिनेत्रीनं लाईफस्टाईलबाबत माहिती दिली. तसेच मेनोपॉजबाबत खुलासा केला. तिचा मेनोपॉजचा प्रवास नेमका कसा होता? याबाबत तिनं सांगितलं. 'मला खराब चार्जरवाला फोन असल्यासारखं वाटलं', असं ट्विंकल म्हणाली. मेनोपॉजबाबत कुणीही उघडपणे बोलत नाही. मात्र, ट्विंकलने मेनोपॉजबाबत मोकळेपणाने भाष्य केले. ट्विंकलचा मेनोपॉजपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? पाहुयात.
ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत
अलिकडेच ट्विंकल खन्नाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीन फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती मेकअप फ्री लूकमध्ये दिसली. या फोटोंवर तिनं लक्षवेधी कॅप्शन दिलं. या कॅप्शनमधून तिनं मेनोपॉजचा प्रवास शेअर केला. अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, '52 या वर्षात, मेकअप फ्री. मी म्हणेन की दुपारचा थोडासा सूर्यप्रकाश बरं वाटण्यासाठी, तसेच सुंदर दिसण्यासाठी पुरेसं आहे. परंतु, मेनोपॉज इतके उदार नाही. मी बऱ्याचदा विनोद करत होते, की मेनोपॉज माझ्यापेक्षा वाईट आहे. मला खराब चार्जरवाला फोन असल्यासारखं वाटलं", असं तिनं सांगितलं.
'स्वत:ला स्वीकारणेही तितकेच महत्त्वाचे आहे'
"मला आता बरे वाटते आहे. मी माझे वय स्वीकारले आहे. मी नियमित वेट ट्रेनिंग करते. उत्तम आहार. तसेच पुस्तकांमध्ये आनंद शोधणे या सगळ्याच गोष्टी मी करते. शेवटी काय तर, स्वत:ला स्वीकारणेही तितकेच महत्त्वाचे आहे", असंही तिनं सांगितलं. ट्विंकल खन्ना स्वत:च्या तब्येतीची योग्य काळजी घेत आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तिनं उत्तम जीवन जगण्याचा मंत्र निवडला आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं मेनोपॉजदरम्यान, घेत असलेल्या सप्लिमेंट्सबद्दलही सांगितले. "अजूनही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या फायद्यांचा आणि तोट्यांचा काळजीपूर्वक विचार करत आहे. सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा", असा सल्लाही तिनं दिला. सध्या ट्विंकल खन्नाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिनं पोस्टद्वारे मेनोपॉजचा प्रवास शेअर केल्यामुळे तिचं नेटकऱ्यांकडून कौतुकही होत आहे.