Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) हैदराबादमधील ज्युबली हिल्सच्या घराबाहेर काही अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची बातमी समोर आलेली आहे. तसेच या लोकांनी अल्लू अर्जुनचा निषेधही केला. याप्रकरणी जेएसी नेत्यांवर तोडफोड केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी  जेएसी नेत्यांना ताब्यात घेतल्याचीही माहिती देण्यात आली आहे. निदर्शनानंतर तेथे उपस्थित काही अज्ञात लोकांनी जबरदस्तीने अभिनेत्याच्या घराच्या परिसरात घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं. 


या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी म्हटलं की, "उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संबंधित असलेल्या जेएसीच्या 6 कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. पण अद्याप या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना कोणतेही अपशब्द न वापरण्याचं आवाहन केलं आहे. 


अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया काय? 


ही दगडफेक झाल्यानंतर अल्लू अर्जुने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, मी माझ्या सगळ्या चाहत्यांना आवाहन करतो की, कोणत्याही पद्धतीचे अपशब्द वापरु नयेत. माझ्या चाहत्यांना खोटे आयडी आणि प्रोफाईल बनवून बदनाम केलं जात आहे. जर माझ्या चाहत्यांपैकी यामध्ये कुणी सामील असेल तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारत अडकू नये असं आवाहन मी चाहत्यांना करत आहे.


त्या घटनेवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचीही प्रतिक्रिया


हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये घडलेल्या घटनेवर तेलंगणाच्या विधानसभेतीही चर्चा झाली. यावेळी तेलगंणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं की, अभिनेता त्यावेळी बेजबाबदारपणे वागला आहे. त्या महिलेच्या मृत्यूची बातमी मिळाली तरीही तो त्या थिएटरच्याबाहेर पडला नाही. ते कुटुंब महिन्याला 30 हजार रुपये कमावतं पण त्यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा फॅन आहे, म्हणून त्यांनी 3000 रुपयांचं तिकीट काढून सिनेमा पाहिला. 


नेमकं प्रकरण काय?


पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान, संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या 8 वर्षांच्या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. याच प्रकरणात अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती.  मात्र, तेलंगणा उच्च न्यायालयाने 4 आठवड्यांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली.


ही बातमी वाचा : 


Mufasa Box Office Collection Day 2: हॉलीवूड सिनेमा 'मुसाफा'ची बॉक्स ऑफिसवर दहशत, 'पुष्पा 2' समोर असतानाही दमदार कमाई