Sonali Phogat Death : टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचं काल (मंगळवारी) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली यांना भाजपकडून हिसारमधून उमेदवारी देण्यात आली होती. रियॅलिटी शो 'बिग बॉस'मुळेही (Big Boss) सोनाली फोगाट चर्चेत आल्या होत्या. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांना मृत घोषित केलं. गोवा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची (Unnatural Death) नोंद केली आहे. 


सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आज सोनाली फोगाट यांचं पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारस, पोस्टमार्टमनंतरच सोनाली यांच्या मृत्यूचं कारणं समोर येतील. तसेच, त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. 


गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये केलं होतं जेवण 


सोनाली फोगाट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्याच्या दौऱ्यावर होत्या. असं सांगण्यात येत आहे की, सोनाली यांनी गोव्यातील अंजुनाच्या 'कर्लीज' रेस्टॉरंटमध्ये अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सध्या तरी या प्रकरणात काहीही संशयास्पद बाबी समोर आलेल्या नाहीत. 


पाहा व्हिडीओ : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध सोनाली फोगाट यांचं निधन



सीबीआय चौकशीची विरोधकांची मागणी


हरियाणा (Haryana) मध्ये एकीकडे सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सोनाली यांच्या बहिणीचं म्हणणं आहे की, सोनाली यांनी गोव्यात जेवल्यानंतर त्यांना फोन केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, त्यांना बर वाटत नसून अस्वस्थ वाटत आहे. 


सोनाली फोगाट आणि वाद!


सोनाली फोगाट या अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या होत्या. जून 2020 दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोनाली फोगाट एका अधिकाऱ्याला चप्पल मारताना दिसल्या होत्या. सोशल मीडियावरील या वादामुळे बराच गदारोळ झाला होता. यानंतर सोनाली फोगाट यांनी त्यांची बहीण आणि भावाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यामुळे देखील त्या चर्चेत आल्या होत्या. यांनंतर त्या त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेत आल्या होत्या. ‘बिग बॉस 14’च्या घरात त्यांनी आपल्याला अली गोनी आवडतो, असे म्हटले होते. यावरून घरात बराच वाद झाला होता.


सोनाली फोगाट 2019 दरम्यानच्या त्यांच्या एका भाषणामुळे देखील वादात अडकल्या होत्या. हिसारमधील एका गावात रॅलीदरम्यान त्यांनी लोकांना 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यास सांगितले होते. जे लोक घोषणा देत नाहीत, ते नक्कीच पाकिस्तानचे आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर सोनाली फोगाट यांना त्याच्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली होती.