Thriller Web Series On Netflix: सध्या अनेक चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) थेट ओटीटीवर रिलीज केले जातात. तसेच, अनेकजण थिएटरऐवजी ओटीटीवरच (OTT) बातम्या आणि वेब सीरिज पाहणं पसंत करतात. अशातच आज आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्स वरच्या काही प्रसिद्ध वेब सीरिजबाबत सांगणार आहोत. नेटफ्लिक्सवरची (Netflix) सर्वात गाजलेली सीरिज म्हणजे, मनी हाईस्ट. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध वेब सिरीजपैकी एक असलेल्या 'मनी हेस्ट'चा पहिला सीझन 2017 मध्ये स्ट्रीम झाला होता. आतापर्यंत या मालिकेचे 5 सीझन आलेत. प्रत्येक सीझनला लोकांनी भरभरुन प्रेम दिलंय. पण, आता तुम्ही मनी हाईस्टला कंटाळला असाल आणि काहीतरी वेगळं शोधण्याच्या प्रयत्नात असाल, तर आम्ही तुम्हाला काही पर्याय देत आहोत. मनी हाईस्टप्रमाणेच या कथाही तुम्हाला खिळवून ठेवतील. 


माईंडहंटर (Mindhunter)



'माइंडहंटर' या थ्रिलर वेब सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत आणि तिचा पहिला सीझन देखील 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात जोनाथन ग्रोफ, ॲना टॉर्वसह अनेक स्टार्स दिसले. 70 च्या दशकातील कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एफबीआय एजंट गुन्हेगारांच्या मनाशी कसे खेळतात आणि त्यांची गुपितं जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, हे रंजकपणे दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज पाहिल्यावर तुम्ही पुरते हादरुन जाल. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.


डार्क (Dark)



जर्मन सायन्स फिक्शन थ्रीलर वेब सीरिज असलेली डार्क, तुम्ही पाहिली नसेल, तर नक्की पाहा. ही सीरिज बरन बो ओडर आणि जँटजे फ्रिस या जोडीने तयार केली आहे. 2017 ते 2020 पर्यंत डार्कचे तीन सीझन आले आहेत. ही कथा जर्मनीतील विंडन या काल्पनिक शहरात रचली गेली आहे आणि टाईम ट्रॅव्हल, कुटुंब आणि एका छोट्या शहरातील रहस्यांनी भरलेल्या जगाचं चित्रण करते. ही सीरिज तुम्ही Netflix वर पाहू शकता. 


नार्कोज (Narcos)



2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत, ज्यामध्ये हॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध स्टार्स दिसले आहेत. या सीरिजची कथा वास्तविक जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये कोलंबियाच्या ड्रग स्मगलर्सच्या अंधाऱ्या दुनियेची खोल रहस्य उलगडली आहेत. ही सीरिज तुम्ही Netflix वर पाहू शकता.


अरण्यक (Aranyak)



रवीना टंडन अभिनीत या सीरिजचा पहिला सीझन 2021 मध्ये आलेला. यामध्ये डोंगराळ भागात तैनात असलेले दोन पोलीस वेगवेगळ्या दृष्टिकोनातून खुनाच्या संशयितांचा तपास करताना दिसतात, तेव्हा राजकीय डावपेच, वैयक्तिक हेतू आणि काही रचलेल्या गोष्टी उघडकीस येतात.


यू (You)



2018 पासून या मालिकेचे 4 सीझन आले आहेत. यामध्ये तुम्हाला प्रत्येक सीनमध्ये सस्पेन्स पाहायला मिळणार आहे, जो पाहिल्यानंतर तुमची झोप नक्कीच उडणार आहे.