bolvita dhani: आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेले आणि लेखक-दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अष्टपैलू कलाकार हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) हे रंगभूमीवर पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत रंजक विषयावर आधारित नाटक घेऊन येत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ च्या सौजन्याने साकारलेले हे नवे नाटक म्हणजे ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर हृषिकेश जोशी यांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून हे दुसरे मोठे नाटक असून, या प्रयोगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Continues below advertisement

कशी सुचली नाटकाची कल्पना?

हृषिकेश जोशी यांनी हे नाटक वर्तमान सांस्कृतिक, समाजकारण आणि राजकारण यावर मार्मिक भाष्य करणारे असल्याचे सांगितले आहे. एनएसडीच्या फॉर्मर डिरेक्टर अनुराधा कपूर यांनी 'गोष्ट संयुक्त मानापनाची' या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर हृषिकेश यांना या नाटकाच्या विषयावर लेखन करण्याची कल्पना सुचवली. विनोदाचा आणि वास्तवतेचा सुरेख संगम 'बोलविता धनी' हे केवळ भाष्य करणारे नाटक नसून, ते एक रंजक आणि परिपूर्ण मनोरंजन आहे. यात भरपूर विनोद आहे, उत्तम ड्रामा आहे, एक सुंदर लव्हस्टोरी आहे आणि काही जुन्या घटनांचे संदर्भही यात पहायला मिळतील. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही गोष्ट एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास हृषिकेश जोशी व्यक्त करतात.

कलाकारांची तगडी फौज 

कलाकारांची मोठी फौज या नाटकात प्रमुख भूमिकेत असलेले क्षितीश दाते, संग्राम साळवी, ओंकार कुलकर्णी, मयुरा रानडे, सिमरन सईद यांसारखे ताकदीचे कलाकार आहेत. त्यांच्यासह प्रद्युम्न गायकवाड, परमेश्वर गुट्टे, निरंजन जावीर, सागर यार्दी, अजिंक्य पोंक्षे, दीपक गोडबोले, निलेश गांगुर्डेहे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे, या नाटकात रंगभूमीच्या पडद्यामागील महत्त्वाचे कलाकार म्हणजेच मेकअपमन, प्रोडक्शन मॅनेजर, हेअर ड्रेसर आणि वेशभूषाकार हे व्यावसायिकही पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत, जे या नाटकाचे वेगळेपण अधोरेखित करते. हृषिकेश जोशी यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला हा 'बोलविता धनी' कोण आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगांना नक्की हजेरी लावावी. येत्या 13  डिसेंबरला रात्री 9.30  वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे, मुंबई मधील शुभारंभ 24 डिसेंबर दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे 'बोलविता धनी' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे.

Continues below advertisement