एका लग्नाची दुसरी गोष्ट, अग्निहोत्र,  मुंबई पुणे मुबई, कबड्डी-कबड्डी, जोगवा आदी अनेक चित्रपट-नाटकातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे हीचा 17 मे हा वाढदिवस. या वाढदिवशी तिला सोशल मीडियावरून अनेक शुभेच्छा मिळाल्या. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी एरवी कुठेच न दिसणारी मुक्ता बर्वे इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली. त्यावेळी तिने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं तर दिलीच. शिवाय, या कोविड काळात आपल्या बदललेल्या दृष्टिकोनाची माहीतीही मोकळ्या मनाने दिली. 


इन्स्टाग्रामवर मुक्ता सायंकाळी लाईव्ह आली. यावेळी तिच्या चाहत्यांनी, फॉलोअर्सनी तिला भरघोस शुभेच्छा दिल्या. या स्वीकारताना मुक्ता म्हणाली, खरंतर गेले दोन्ही वाढदिवस म्हणजे हा वाढदिवस आणि गेल्या वर्षीचा. असे दोन्ही वाढदिवस माझे लॉकडाऊनमध्ये गेले. गेल्या वाढदिवशी मला फार वाटे की हे सगळं कधी संपणार आहे, कधी शुटिंग सुरू होणार आहे. ते जास्त महत्वाचं आहे. अशी माझी भावना होती. पण यावेळी माझी भावना वेगळी आहे. यावेळी आपण आपला वाढदिवस साजरा करू शकतोय याबद्दल मला कृतज्ञ वाटतं. या मधल्या काळात मला, माझ्या कुटुंबियांना कोविड होऊन गेला. त्यानंतर आता मी तुमच्यासमोर आहे. दुसरी लाट फार भयानक आहे. अशावेळी मी हा वाढदिवस घरी असून माझ्या कुटुंबियांसमवेत साजरा करू शकते आहे हाच मला आनंद देणारं आहे. 


यावेळी चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंच. शिवाय, तिला अनेक प्रश्नही विचारले. यात विशेषत: वाढदिवशीच्या प्लॅन्सबद्दल आवर्जून प्रश्न विचारले गेले. त्यावेळी बोलताना मुक्ता म्हणाली, आजचा वाढदिवस खरंतर मी माझ्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार साजरा करणार होते. या लॉकडाऊनमध्ये मी नित्यनेमाने करू लागले तो म्हणजे माझा व्यायाम. शिवाय, मी आज सायकलिंगलाही जाणार होते.पण पावसामुळे ते शक्य झालं नाही. उद्या जर वातावरण पोषक असेल तर मी सकाळी उठून सायकलिंगला जाणार आहे. मी या काळात आवर्जून फिरायलाही जाते असंही ती म्हणाली. 


सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरी आहे. शिवाय, दुसऱ्या लाटेने प्रत्येकाचं नुकसान केलं आहे. आर्थिक, कौटुंबिक अनेक स्तरावर प्रत्येकजण आपआपलं नुकसान पेलतो आहे. जगतो आहे. मुक्तानेही आपल्याबद्दल माहीती सांगताना, आता आलेला प्रत्येक दिवस भरपूर वाचन. चित्रकृती पाहण्यात घालवत असल्याचं ती म्हणाली. इन्स्टावर सुरू असलेल्या या लाईव्ह सेशनला मुक्तासह सिने-नाट्यसृष्टीतल्या अनेकांनी हजेरी लावून मुक्ताला शुभेच्छा दिल्या.