Darling Movie : सिनेमागृहे सुरू होणार असल्याचे राज्यसरकारने जाहीर केले. त्यानंतर बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही आनंदी आनंद आहे. हिंदीसह मराठीतील प्रोडक्शन हाऊसेसची खऱ्या अर्थाने लगीनघाई म्हणजेच चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षभरापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांच्या तारखा एका मागोमाग एक घोषित केल्या जात आहेत. मराठीतील बहुचर्चित चित्रपट असलेल्या 'डार्लिंग' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहिर करण्यात आली आहे. 


डार्लिंग हा सिनेमा 10 डिसेंबर 2021 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'डार्लिंग' सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच सिनेसृष्टीसोबतच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. समीर यांनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत मराठीच्या कक्षा रुंदावणाऱ्या चित्रपटांचं आपल्या अनोख्या शैलीत दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे अर्थातच "डार्लिंग" सिनेमाकडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे लांबणीवर गेलेल्या "डार्लिंग"च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे. 


या चित्रपटातील "डार्लिंग तू" हे टायटल साँग असो वा "ये है प्यार..." हे टायटल साँग. संगीताच्या माध्यमातून देखील "डार्लिंग"ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं कथानक या चित्रपटाचा खरा नायक आहे. चित्रपटात प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्रीची जोडी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. प्रथमेश आणि रितीकाची जोडी याआधी "टकाटक" चित्रपटात दिसून आली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना या गाजलेल्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात दिग्दर्शनासोबत "डार्लिंग"चं लेखनदेखील समीर पाटील करणार आहेत. प्रथमेश, रितीका सोबत निखिल चव्हान, मंगेश कदम, आनंद इंगळे यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. चिनार-मंगेशया संगीतकार जोडीने चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. 


"डार्लिंग"ची निर्मिती 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा.लि.व्ही.पतके फिल्मस आणि मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही.जे.शलाका आणि निखिल खजिनदार यांनी केली आहे. हा चित्रपट खरेतर या वर्षाच्या सुरूवातीलाच प्रदर्शित होणार होता. पण सिनेमागृहे बंद असल्याने या चित्रपटाची निर्मिती येत्या वर्षात होणार आहे.