मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहेत. त्यासाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांचे पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून यात आता बाह्य राजकीय हस्तक्षेपाचा आरोप होत असल्यानं नाट्य परिषदेच्या निवडणुका आहेत की राजकीय आखाडा असा प्रश्न निर्माण झालाय. 


एखाद्या राजकीय निवडणुकीला इतकं महत्व प्राप्त झालेलं नसेल तितकं यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला झालंय. यंदा दामले वर्सेस कांबळी अशी वरकरणी लढाई असली तरी यंदाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बंगल्यावर बैठका घेऊन दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे काम सुरू आहे तर प्रसाद कांबळी यांना शरद पवारांचा पाठिंबा असल्याचेही बोलले जात आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्वीट करत त्यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले पण उदय सामंत यांनी मात्र यावर कोणतेही भाष्य केले नाही. 


अवघ्या काही तासांवर ही निवडणूक आली असून दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. जे काम नाट्य परिषदेने करायला हवं होतं तर आम्ही केलं असं दावा दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाने केला आहे. तर पाच वर्षातील कामाचा सविस्तर लेखाजोखा मांडत प्रसाद कांबळी देखील 'आपलं पॅनल'मधून शड्डू ठोकून उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता भलतीच अटीतटीची झालीआहे. 


दामले विरुद्ध कांबळी


प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलमध्ये दिग्गज कलाकार आहेत. ज्यात विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे 


प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर यांचा समावेश आहे. 


प्रशांत दामले यांची प्रतिक्रिया


प्रशांत दामले म्हणाले की, "आम्ही 14 जण नाट्यसृष्टीसाठी काम करतच असतो, त्यामुळे आम्ही विचार केला मोठ्या कॅन्व्हासवर काम करायचं आहे तर हा मंच योग्य आहे. त्यामुळे निवडणूक लढवावी असं ठरवलं. आरोप प्रत्यारोपात आम्हाला रस नाही, माझ्याकडे अनेक कागदपत्रं आहेत, काय केलं ते सर्वांना माहिती आहे. मात्र माझं म्हणणं आहे जे झालं ते झालं, आपण पुढचा विचार करायला हवा. संलग्न असलेल्या घटकांना यातून कशी मदत करता येईल हे बघूयात. कोव्हिड काळात नाट्य परिषदेला अनेक ठिकाणी हात पसरावे लागले, तसं होता कामा नये. सर्वांनी आपापल्या परीनं मदत केली, मात्र ती कोणाला करायची हा विषय होता. नाम तर्फे मदत झाली तेव्हा त्यांची लिस्ट होती 454 जणांची. आमची होती 357 जणांची, हा फरक आहे. रंगकर्मींना पैसे देताना आमची जी धावपळ झाली ती नाट्य परिषदेची होऊ नये यासाठी आम्ही येत्या काळात प्रयत्न करणार आहोत."


विरोधकांनी घटक संस्थात फूट पाडली, प्रसाद कांबळींचा आरोप


प्रसाद कांबळी यांनी प्रशांत दामले यांच्या पॅनेलवर आरोप करताना म्हटलं की, निवडणूक लढणार नव्हतो, मी सांगितलं होतं मला संस्थात्मक राजकारणात रस नाही. आम्हाला माहिती नव्हतं कोण उभं राहाणार. मात्र, ज्यांनी निर्माता संघात फूट पाडली, कोरोना काळात घटक संस्थात फूट पाडली आणि त्यावेळी पळून गेले तेच लोकं पॅनलमध्ये आली. त्यावेळी देखील मी बोललो की आपण उभं राहू नये, मात्र माझ्या पॅनलमधील लोकं त्या मताची नव्हती. नाट्य परिषदेत जर लोकांनी फूट पाडली आणि पुन्हा पळून गेली तर नाट्य परिषदेच्या इकोसिस्टिमला धक्का बसेल. आम्ही मुंबई आणि मुंबई उपनगरातच पॅनल उभं केलंय 


आम्ही सर्व घटकांना मदत केली, सगळ्यांना मदत करणं आणि काही लोकांना मदत करणं हा फरक आहे. नाट्य परिषदेनं खूप मोठं काम केलं, आम्ही कधीच म्हणत नाही कोणी कामं केली नाहीत. मी फक्त तीन जणांनाच मदत करणार हे चुकीचं आहे. ज्या घटक संस्थांनी लिस्ट दिली त्या सर्वांना आपण मदत केली असं प्रसाद कांबळी म्हणाले. 


प्रसाद कांबळी म्हणाले की, विरोधकांनी जे पॅनल उभं आहे त्यात एक तरी रंगमंच कामगार आहे का? प्रशांत दामले आधी देखील होते, त्यांनी आधी का कामं केली नाहीत. नाट्य परिषदेच्या 40 सभा झाल्या त्यातील 20 सभांना ते फक्त उपस्थित होते. 10 डिसेंबरला एजीएमनं सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत, त्यामुळे सर्व रंगमंच कामगार आमच्या बाजूनं उभा आहे. 


प्रशांत दामले यांच्या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत तर दुसरीकडे प्रसाद कांबळींच्या पॅनलमध्ये रंगमंचकलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे एकमेकांवर होत असलेल्या राजकीय आरोपात नाट्यकर्मी नेमकी कुणाची निवड करणार आणिकुणाच्या माथी विजयाचा गुलाल लागणार हे येत्या काही तासातच स्पष्ट होणार आहे