आपल्याला आपले आई-वडील सर्वस्व असतात. आपण जे काही करत असतो. आपण जे यश मिळवत असतो त्यावर त्यांचं लक्ष असतं आणि आपण केलेल्या कामाने त्यांना आनंदही होत असतो. अभिनेत्री ईशा केसकर आणि तिच्या पालकांचं नातंही असंच आहे. त्यात ईशा आणि तिच्या वडिलांचं नातं जास्त घट्ट होतं. हे लक्षात आलं ते ईशाच्याच इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून. ईशाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. त्यांची भरून न येणारी पोकळी ईशाने आपल्या ईन्स्टाग्राममधून मांडली आहे. या पोस्टला तिने नाव दिलं आहे मिस यू बाबूस्की. दरम्यान ही पोस्ट नंतर ईशाने डिलीट केली आहे.


सोशल मीडियावर ईशा केसकर नेहमी कार्यरत असते. ती कुठेही फिरायला गेली, कोणता नवा पदार्थ खायला गेली की त्यासोबतचा एक फोटो तर तिच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड झालेला असतो. अभिनेता ऋषी सक्सेना याच्यासोबत ती सध्या रिलेशनशीपमध्ये आहे. त्या दोघांचे एकत्र फोटो तिच्या चाहत्यांना पहायला मिळत असतात. त्यामुळेच ईशाच्या सोशल मीडिया पेजला भेट देणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. दोन दिवसांपूर्वी ईशाच्या इन्स्टा पेजवर तिचा बाबांसोबतचा फोटो आणि त्याखाली मिस यू बाबुस्की या ओळी वाचून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला. ईशाच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ईशाला धक्का बसणे स्वाभाविक आहे. 24 नोव्हेंबरला तिचे बाबा तिच्यापासून कायमचे दूर गेले.


ईशाने तिच्या बाबांच्या अनेक आठवणींना या फोटोसोबत लिहिलेल्या ओळींमधून जागवले आहे. ईशाला तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात तिच्या बाबांची खूप साथ होती हेच त्यातून दिसून येत आहे. ईशाच्या शालेय वयातही तिच्या बाबांनी तिला तिच्या आवडीप्रमाणे नाटकात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. ईशा सांगते, माझ्या प्रत्येक गोष्टीत बाबा माझ्या सोबत होते. मी कोणतं कॉलेज निवडायचं, कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हा निर्णय घेतानाही त्यांनी विरोध केला नाही. मी अभिनयात करिअर करायचं ठरवलं तेव्हा आईनेही नकार दिला होता. पण फक्त बाबांनीच मला साथ दिली. आता ते कधीच माझ्यासोबत नसतील याचं खूप दु:ख आहे.


ईशा मुळची पुण्याची असून तिचे कॉलेजचे शिक्षण सिम्बॉयसिस कॉलेजमधून झाले. कॉलेजमध्ये असतानाच तिने पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेत पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर मंगलाष्टक वन्स मोअर, वुई कॅरी ऑन यासारख्या सिनेमात काम केलं. जय मल्हार या मालिकेतील बानू ही भूमिका तिला मिळाली आणि याच बानूच्या रूपात ईशाला ओळख मिळाली. पहिल्याच मालिकेतील ईशाचा अभिनय कौतुकाचा ठरला. त्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया या भूमिका करणाऱ्या रसिका सुनील हिने ती मालिका सोडल्यानंतर शनायाच्या भूमिकेसाठी ईशाची वर्णी लागली.


इतर महत्वाच्या बातम्या : 


..आणि छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे