Todi Mill Fantasy : 'तोडी मिल फॅन्टसी' (Todi Mill Fantasy) या बहुचर्चित प्रायोगिक नाटकाचा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. 2018 साली 'तोडी मिल फॅन्टसी' हे नाटक रंगभूमीवर आलं आणि नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरलं. आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या नाटकाचा 10 मार्च 2023 रोजी ठाण्यात प्रयोग पार पडणार आहे. आजवर 'अधांतर', 'कॉटन 52 पॉलिस्टर 85' सारख्या गिरणी कामगारांची व्यथा मांडणारी अनेक नाटकं येऊन गेली आहेत. मात्र 'तोडी मिल फॅन्टसी' हे त्याची पुढची गोष्ट सांगणारं नाटक आहे.
'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात काय पाहायला मिळेल?
भारतात स्टार्टप इंडियाची जी लाट आली आणि त्या लाटेटून खूप सारे तरुण उद्योजक जन्माला आले. काहींनी भरारी घेतली काही कोसळून पडले. भारतातल्या छोट्या गावापासून ते मोठ-मोठ्या शहरामध्ये नाक्या-नाक्यावर नोकरदारीला वैतागलेल्या तरुणांना स्वत: उद्योजग व्हायची स्वप्न पडायला लागली. त्यातून जन्माला आल्या क्लास शिप्ट करण्याच्या चांगळवादी फँटस्या, पटकन श्रीमंत होण्याची स्वप्न आणि त्या फँटसी पूर्ण करण्यासाठी उद्योगाच्या मुळाशी आत्मसात झालेलं स्वकेंद्री तत्त्व. या सगळयांचा म्युसिकल फार्स म्हणजे 'तोडी मिल फँटसी' हे पावर फुल म्यूजिकल नाटक. या नाटकात रॅप, रॉक, मेटल, रेगे, कवाली या सर्व म्युसिकल फॉर्मचा वापर केलेला आहे.
'तोडी मिल फॅन्टसी' हे नाटक एका आलिशान कॅफेच्या चकचकीत स्वच्छतागृहात घडतं. ईशा सिंह नावाची एक अॅन्ड फिल्म मध्ये काम करणारी मॉडेल पोलिसांची ड्रिंक अँड ड्राइव्हची नाकाबंदी तोडून लपण्यासाठी रात्री दीड वाजता तोंडी मिल सोशलच्या स्वच्छतागृहात येऊन लपते आणि घंट्या पावेशला आदळते. ईशा सिंह ही मॉडेल घरी जायच्या घाईत असलेल्या घंट्याला स्वतःच्या सौंदर्याच्या जोरावर रात्रभर स्वच्छतागृहामध्ये थांबण्याची गळ घालते. घंट्या तिच्या मादकतेसमोर थांबायला तयार होतो आणि त्या दोघांमध्ये झालेल्या संवादातून उलगडत जातं 2021 मधल्या अधिका-अधिक लखलखीत होत जाणाऱ्या मुबंईच वास्तव.
'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकाचं लेखन सुजय जाधवने केलं आहे. तर या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा विनायक कोळवणकरने सांभाळली आहे. नाटकाला देसी RIFF आणि कपिल रेडेकरचं संगीत लाभलं आहे. या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके,जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात शिऱ्याची भूमिका करणारा जयदीप मराठे म्हणाला,"2018 साली या नाटकाच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतल्या या नाटकाची प्रोसेस पुण्यात झाली होती. मुंबईतील लालबाग-परळच्या अवती-भोवती फिरणारं हे नाटक आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर त्यांच्या घरात खूप बदल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आता या संपानंतर गिरणी कामगारांची पुढची पिढी काय करते, शहर कसं बदलत आहे, गिरणी कामगारांच्या संपाचा परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीला कसा भोगावा लागतोय या सगळ्याचं भीषण वास्तव मांडणारं 'तोडी मिल फॅन्टसी' हे नाटक आहे".
अम्याची भूमिका साकारणारा श्रीनाथ म्हात्रे म्हणाला,"फॅन्टसी म्हटलं की परीकथा किंवा स्वप्नवत गोष्ट समोर येते. पण गिरणगावात घडणाऱ्या गोष्टींचे पडसाद तरुण पिढीवर कसे पडले आहेत हे फॅन्टसी स्वरुपात 'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात मांडण्यात आले आहेत".
'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात संगीत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं. रॉक, रॅप, जॅझ, ऑपेरा अशा विविध प्रकराची सफर घडवून आणणारं हे नाटक आहे. नाटकातलं रापचिक संगीत प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. या नाटकाच्या मांडणीपासून ते अभिनयापर्यंत सर्वच गोष्टी ताज्या दमाच्या आहेत.
तोडी मिल फॅन्टसी
- कुठे पाहू शकता? डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
- कधी? 10 मार्च
- किती वाजता? रात्री 8. वाजता
संबंधित बातम्या