माणूस हा सवयींचा गुलाम असतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच टीव्ही हे माध्यम फक्त एण्टरटेन्मेण्ट म्हणून न उरता ती आता एक सवय बनलीय. सकाळचा चहा असो वा रात्री कामावरुन परतल्यानंतर घेतलेला पाण्याचा घोट असो प्रत्येकाचीच नजर घरातला रिमोट शोधत असते. प्रेक्षकांची हीच सवय हेरुन या वर्षात वाहिन्यांनी नवनव्या शोजचा रतीबच देऊ केला. आणि हा रतीब देण्यात सर्वात आघाडीवर होती झी युवा ही वाहिनी.


गर्ल्स हॉस्टेल, अंजली, फुलपाखरु, प्रेम हे, सरगम, रुद्रम आणि नव्याने दाखल झालेले बापमाणूस आणि देवाशपथ दे दोन शोज या वाहिनीवर पाहायला मिळाले. टीआरपीच्या रेसमध्ये जरी या मालिका नसल्या तरी या मालिकांनी रसिक मनावर  छाप सोडली हे विसरुन चालणार नाही. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो रुद्रम मालिकेचा. मुक्ता बर्वे, सतीश राजवाडे, मोहन आगाशे यासारखी तगडी स्टारकास्ट, उत्कंठावर्धक कथानक आणि उत्तम लोकेशन या सर्व जमेच्या बाजू असताना रुद्रम लोकप्रिय झाली नसती तरच नवल.

मालिकांच्या या भाऊगर्दीत झी युवाची लव्ह लग्न लोचा ही मालिका अजूनही तग धरुन आहे. वाहिनीच्या नावाप्रमाणेच मालिकेत असणारी युवा गँग त्यांच्या आयुष्यातली प्रेमप्रकरणं आणि त्यात होणारे लोचे असल्यामुळे ही मालिकाही उजवी ठरतेय. नव्या वर्षात डान्स महाराष्ट्र डान्स हा रिअॅलिटी शो तर गुलमोहर ही नवी मालिका झी युवावर भेटीला येणार आहे.

झी मराठी अग्रेसर

झी मराठीबद्दल सांगायचं तर सध्या पाचही बोटं तुपात अशीच वाहिनीची सद्यपरिस्थीती आहे. पाचही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असल्यामुळे मालिकेने नंबर वन हे बिरुद कायम राखलंय. माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, लागीरं झालं जी आणि नव्या सुरु झालेल्या तुझं माझं ब्रेकअप आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिका पहिल्या पाचात आहेत. यापैकी तुझ्यात जीव रंगला आणि लागीरं झालं जी या ग्रामीण बाजाच्या सीरिअल्स असल्यामुळे वाहिनीने क्लास आणि मास या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ साधल्याचं चित्र उघड आहे.

याशिवाय वर्षभरात जाडूबाई जोरात, जागो मोहन प्यारे, गाव गाता गझाली, नकटीच्या लग्नाला यायचं हं यासारख्या मालिकाही या वाहिनीवर पाहायला मिळाल्या. प्रयत्न वेगळा असूनही म्हणावा तितका प्रतिसाद या मालिकांना मिळाला नाही. आता तर नव्या वर्षात चला हवा येऊ द्याची टीम विश्वदौऱ्यासह पुन्हा भेटीला येत असल्यामुळे टीआरपीच्या आकड्यांमध्ये भरघोस वाढ होणार हे वेगळं सांगायला नको.

स्टार प्रवाहही मुख्य प्रवाहात आलं

टीआरपीचे आकडे मालिकांचं आणि ओघाने चॅनेलचं भविष्य ठरवत असल्यामुळे सध्याची आघाडीची दुसरी वाहिनी आहे स्टार प्रवाह. वर्षभर अभ्याय न करता वार्षिक परिक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या चलाख विद्यार्थ्याप्रमाणे या वाहिनीने वर्षाअखेरीस बाजी मारली आहे. आता ही विठ्ठलाची कृपा की नकळत सारे घडले कुणास ठाऊक. पण जवळपास दोन-तीन वर्षांनंतर प्रवाहला दोन नंबरचं स्थान पटकावण्यात यश मिळालंय. प्रवाहचा हुकमी एक्का असलेली पुढचं पाऊलही मालिकाही याच वर्षात बंद झाली. नव्या वर्षात शतदा प्रेम करावे ही नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरु होते आहे. शिवाजी साटम यांचा सुपुत्र अभिजीत साटम या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. अभिजीतची ही पहिलीच मालिका असल्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे.

कलर्स मराठीनेही दाखवले नवे रंग

कलर्स मराठी वाहिनीने देखील वर्षभरात नव नव्या शोजचा नजराणा प्रेक्षकांना देऊ केला. यात घाडगे अॅण्ड सून आणि राधा प्रेम रंगी रंगली या दोन मालिका वाहिनीचा श्वास आहेत असं म्हणायला हवं. दोन्ही मालिका कुटुंबप्रधान असल्यामुळे गृहिणीवर्ग एन्कॅश करण्याचा प्रयत्न इथे केल्याचं दिसतं. ‘सूर नवा ध्यास नवा’ या म्युझिकल शोनेही आपलं वेगळेपण सिद्ध करत थेट झी मराठीच्या सारेगमपलाच आव्हान दिलं आहे. कसलेले स्पर्धक, शोची भव्यता आणि मातब्बर जजेस यामुळे सूर नवा ध्यास नवाही प्रेक्षकांना क्लिक होतोय.

मागणी तसा पुरवठा होत असल्यामुळे प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन मराठी मालिकांच्या विश्वात वेगवेगळे प्रयोग होताना दिसले. त्यातले काही फसले तर काहींनी नवा इतिहास रचला.

हिंदी वाहिन्यांमधली टशन

मराठीप्रमाणेच हिंदी वाहिन्यांमध्येही तगडी स्पर्धा पाहायला मिळाली. या सगळ्यात जास्त बोलबाला राहिला तो सोनी टीव्हीच्या पोरस मालिकेचा. ऐतिहासिक मालिका आणि इतिहासाला शोभणारी भव्यता छोट्या पडद्यावर पाहायला मिळाल्यामुळे प्रेक्षकांसाठी तो नक्कीच सुखावह बदल होता. पोरसप्रमाणेच सोनीची सर्वात चर्चेत राहिलेली मालिका म्हणजे ‘पेहेरेदार पिया की’ ही सीरिअल.

9 वर्षाचा मुलगा आणि त्याच्या दुप्पट वयाची असणारी त्याची पत्नी अशी मालिकेची स्टोरी असल्यामुळे प्रोमोपासूनच या मालिकेवर आक्षेप घेण्यात आले. हे आक्षेप इतके टोकाचे होते की निर्मात्यांना मालिका बंद करावी लागली. त्याचच पुढचं व्हर्जन रिश्ता लिखेंगे हम नया या नावाने सुरु आहे. कथानकात फारसे बदल न करता मालिकेतल्या लहान मुलाला तरुण दाखवण्यात आलंय. अर्थात पहिल्या वेळेस झालेल्या कॉण्ट्रोव्हर्सीचं पाठबळ असल्यामुळे मालिका नव्याने लॉन्च करताना फार  कष्ट करावे लागले नाहीत.

बच्चेकंपनीच्या अदाकारीने नटलेला सुपर डान्सर हा शोदेखील काबील ए तारीफ आहे.  एकूणच काय तर भव्यता आणि मांडणीतला सुटसुटीतपणा हा फण्डा सोनीने 2017 मध्ये अवलंबला आणि तो यशस्वीही झाला. त्यामुळेच 2018 मध्ये पृथ्वी वल्लभ हा आणखी एक ऐतिहासिक शो सोनीवर सुरु होतोय. पृथ्वी वल्लभ या राजाची ही गोष्ट आहे.

स्टार प्लस का मागे पडलं?

काही काळ नंबर वनच बिरुद मिरवणारं स्टार प्लल चॅनेल यावर्षात मात्र फारशी चमक दाखवू शकलं नाही. ये है मोहोब्बते आणि अखंड सुरु असलेल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है'चा अपवाद वगळता कोणतेच शो म्हणावे तशी कामगिरी दाखवू शकले नाहीत. एकेकाळी टॉप नंबर्समध्ये असणाऱ्या दिया और बातीचा दुसरा सीझन 'तू सुरज मैं सांझ पियाजी'ही पुरता ढेपाळला. त्यामुळे करण जोहर आणि रोहित शेट्टीचा नवा शो 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स'कडून खुप अपेक्षा आहेत.

कलर्सचा रंग का उडाला

कलर्स वाहिनीला बराच काळ नागिनने तारलं होतं. पण नागिनची बरोबरी कुणीच करु शकलं नाही. बिग बॉसचा अपवाद वगळता एकता कपूरची चंद्रकांताही टीआरपीच्या रेसमध्ये मागे पडली. महाकाली अंत ही आरंभ ही पौराणिक मालिका आणि लाडो 2 अजूनही या स्पर्धेत स्वत:ला चाचपडत आहेत. नव्या वर्षात या शोजना नवा सूर सापडतोय का हे पाहाणं उत्सुकतेच असेल.

झी टीव्हीचा चढता आलेख

आणि आता वळूया झी टीव्हीकडे. टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर असणाऱ्या या वाहिनीची कुमकुम भाग्य ही मालिका मात्र अव्वल आहे. 2017 मध्ये सुरु झालेल्या दिल ढुंढता है, भुतू, डिटेक्टिव्ह दीदी, जीत गयी तो पिया मोरे या मालिकाही वेगळ्या धाटणीच्या ठरल्या. एकूणच काय तर छोट्या पडद्यासाठी यंदाचं वर्ष हे खऱ्या  अर्थाने प्रयोगशील ठरलं. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांचा आलेला ट्रेण्ड स्थिरावला आणि प्रेक्षकांना आपलसं करुन गेला. आता उत्सुकता असेल 2018 मध्ये येणाऱ्या नव्या शोजची.