World Laughter Day 2023 : जागतिक हास्य दिन (World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हसण्याचे खरे तर अनेक मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत. हसल्याने तणाव दूर होतो आणि शरीराला आराम मिळतो. प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) आणि 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हे दोन कार्यक्रम करत आहेत. आज जागतिक हास्यदिनानिमित्त या कार्यक्रमांबद्दल जाणून घ्या...


महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं आहे. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करत होता.


चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) : 'कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, असं म्हणत निलेश साबळे गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधील थुकरटवाडीतील श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे हे विनोदवीर प्रेक्षकांना प्रचंड हसवत आहेत. प्रेक्षकांनीही त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होत आहे. बॉलिवूडकरांनादेखील या कार्यक्रमाची भूरळ पडली आहे.  


फू बाई फू (Fu Bai Fu) :  'फू बाई फू' (Fu Bai Fu) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण या कार्यक्रमाला चांगला टीआरपी मिळत नसल्याने चॅनलने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'फू बाई फू'चं पहिलं पर्व खूप गाजलं होतं. त्यामुळे प्रेक्षक या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी या कार्यक्रमाचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'फू बाई फू'च्या नव्या हंगामात ओंकार भोजने, भूषण कडू, नेहा खान, सागर कारंडे, पंढरीनाथ कांबळे, कमलाकर सातपुते, प्राजक्ता हनमकर, माधवी जुवेकर हे दिग्गज विनोदवीर सहभागी झाले होते. 


संबंधित बातम्या


World Laughter Day 2023 : आज 'जागतिक हास्य दिन,' जाणून घ्या या दिनाची सुरुवात आणि हास्याचे फायदे...