मुंबई : स्टार प्रवाहवरील 'साथ दे तू मला' या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि समीरचं लग्न अवघ्या काही दिवसांवर असताना समीर प्राजक्तासमोर एक सत्य उघड करणार आहे.

प्राजक्ताने लग्नानंतर नोकरी करु नये, अशी समीरच्या आईची इच्छा आहे. आयुष्यभर संसारासाठी खस्ता काढलेल्या आईची इच्छा मोडणार कशी?  यासोबतच प्राजक्ताच्या स्वप्नांचं काय? अशा द्विधा मनस्थितीत अडकलेला समीर अखेर प्राजक्ताला लग्नानंतर नोकरी न करण्याचा सल्ला देतो.

समीरच्या या निर्णयाने प्राजक्ताला धक्का बसतो. लग्नानंतरही तिला घर सांभाळून आपलं करिअर करायचं आहे. मात्र नोकरीसाठी समीरकडून नकार मिळाल्यावर आता प्राजक्ता काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निर्णायक प्रसंगी प्राजक्ता करिअरला प्राधान्य देणार की लग्नाचा प्रस्ताव नाकारणार याची उत्कंठावर्धक गोष्ट 'साथ दे तू मला' या मालिकेच्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.