Vaishali Thakkar Case : टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येप्रकरणी (Vaishali Thakkar Suicide Case) इंदूर पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल नवलानी (Rahul Navlani) याला अटक केली आहे. आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पोलीस राहुल आणि त्याच्या पत्नीच्या शोधात होते. मात्र, अद्याप राहुलची पत्नी पूजा फरार आहे.
वैशालीच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस या दोघांचा शोध घेत होते. वैशालीने आत्महत्या केल्याचे कळताच हे दोघे पती-पत्नी गायब झाले होते. पोलिसांनी दोघांना फरार घोषित करत आरोपींवर प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपी राहुलला अटक केली. मात्र, त्याच्या पत्नीचा अद्याप शोध लागलेला नाही. आरोपींच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच तिलाही अटक करण्यात येईल.
राहुलने केली होती पळून जाण्याची तयारी
या संदर्भात माहिती देताना इंदूरचे पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा म्हणाले की, ‘पोलिसांचे पथक आरोपी जोडप्याचा शोध घेत होते आणि यादरम्यान राहुल नवलानीला अटक करण्यात टीमला यश आले. राहुल इंदूरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण असे करण्याआधीच त्याला पकडण्यात आले होते. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, राहुलची पत्नी दिशा अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे.’
सुसाईड नोटमधून उलगडले आत्महत्येचे रहस्य
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने नुकतीच तिच्या इंदूरच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या घरात सुसाईड नोट सापडल्यानंतर या आत्महत्येचे रहस्य उलगडले होते. सुसाईड नोटमध्ये वैशालीने लिहिले होते, तिचा विवाहित एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी तिला खूप त्रास देत होता. यामुळे वैशाली चांगलीच वैतागलेली होती. याप्रकरणी तिच्या आई-वडील आणि भावाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
वैशाली ठक्कर गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय होती. तिने अनेक प्रसिद्ध आणि टॉप रेटिंग टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. 'सुसरल सिमर का' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या टीव्ही मालिकांशिवाय वैशाली 'सुपर सिस्टर्स', 'विश या अमृत', 'मनमोहिनी 2' आणि 'ये है आशिकी'मध्येही झळकली होती.
संबंधित बातम्या