मुंबई : शनिशिंगणापूरच्या मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश असो, वा हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश, स्त्रियांचा आवाज हिरीरीने मांडणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई लवकरच 'बिग बॉस'चा पाहुणचार स्वीकारण्याची शक्यता आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पुढील पर्वामध्ये तृप्ती देसाई दिसण्याची शक्यता आहे.

 
तृप्ती देसाई यांना बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र तृप्ती देसाई यांनी वाहिनीपुढे अनोखी अट ठेवली आहे. 'बिग बॉस' चा आवाज जर महिलेचा असेल, तरच आपण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक विचार करु, असा उलट प्रस्ताव देसाईंनी ठेवल्याची माहिती आहे.

 
बिग बॉसने केलेल्या सूचनांचं पालन करणं ही स्पर्धकांसाठी सक्तीची बाब असते. दहा पर्वांपासून सुप्रसिद्ध व्हॉईस आर्टिस्ट अतुल कुमार बिग बॉससाठी आवाज देतात. अतुल यांचा आवाज ही बिग बॉसची ओळख बनली आहे. मात्र हाच आवाज बदलण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. त्यामुळे देसाईंपुढे चॅनेल झुकणार, की देसाईंनाच डच्चू मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 
टीव्हीवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि अनेकानेक वाद निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बिग बॉसची चटक अनेक सेलिब्रेटींना लागते. सतत सीसीटीव्ही कॅमेराच्या कैदेत राहून मोबाईल, टीव्ही यासारख्या प्रलोभनांपासून दूर बंदिस्त घरात राहण्यांचं आणि सहस्पर्धकांशी जुळवून घेण्याचं आव्हान सेलिब्रेटींपुढे असतं. मात्र एकत्र राहताना अनेक वाद झडतात. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होऊन त्या आणखी एक वाद ओढावून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.