TMKOC Tapu Quits The Show : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शैलेश लोढाने ही मालिका सोडली होती. आता शैलेशनंतर या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकने (Raj Anadkat) या मालिकेला रामराम ठोकला आहे. 

Continues below advertisement


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत मालिकेला रामराम ठोकला आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकने ही मालिका सोडली आहे. 


राज ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यानंतर या अफवा असल्याचं राजने म्हटलं होतं. मात्र आता राजनेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे.






राजने लिहिलं आहे,"सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याची आता वेळ आली आहे. मी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून आता बाहेर पडत आहे. या मालिकेसंबंधित माझा जो काही करार होता तो आता संपला आहे. या मालिकेचा प्रवास खूपच मस्त होता. मला अनेक गोष्टी शिकता आल्या. या प्रवासात मला मदत केलेल्या प्रत्येकाचे आभार". 


मी पुन्हा येईन...


राजने पुढे लिहिलं आहे,"तारक मेहता मालिकेची संपूर्ण टीम, माझे मित्र, कुटुंबिय आणि तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. तब्बू या पात्रावर तुम्ही सर्वांनी खूप प्रेम केलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी लवकरच पुन्हा येईन आणि तुम्हा सर्वांचं मनोरंजन करेन. तुमचं प्रेम आणि शुभेच्छा असेच असुद्या". 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत टप्पूचे पात्र आधी भव्य गांधी साकारत होता. पण काही कारणाने भव्यने ही मालिका सोडली. त्यानंतर राजने हे पात्र साकारले. राजने मालिका सोडण्याचं खरं कारण सांगितलेलं नाही. करिअरच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासाठी त्याने ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. 


संबंधित बातम्या


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम अभिनेत्रीच्या कारला ट्रकची धडक; अपघातातून थोडक्यात बचावली