Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात आजपर्यंत मांजरेकर शाळा घेत होते. पण आज उत्कर्ष सर विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. प्रोमोमध्ये उत्कर्ष सरांच्या तासाला विद्यार्थी गोंधळ घालताना दिसून येत आहेत. नमस्ते, गुड मॉर्निंग म्हणत सरांचे स्वागत करताना बिग बॉसच्या घरातील विद्यार्थी दिसून येत आहेत. विकास म्हणतो, "सर मी असं ऐकलयं की तुम्ही बिर्यानी खूप छान बनवता". त्यावर उत्कर्ष म्हणतो, "मी माणसांना खूप छान बनवतो. त्यावर जय उत्कर्षला गेट आऊट म्हणतो आहे". तर घरातील शाळेच्या सेटअपमध्ये फळा आहे. त्या फळ्यावर 'सर आज शिकवू नका' असे लिहिलेले आहे.
काल बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा टास्क पार पडला आहे. त्यात घरातील पाच सदस्य सेफ झाले आहेत. तर बाकीचे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. कालच्या टास्कमुळे सुरेखा कुडची घरातील सदस्यांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरुन टीम घेत असलेल्या निर्णयावर काल सुरेखा ताईंनी नाराजी व्यक्त केली होती. त्या टीममधील सदस्यांना म्हणाल्या होत्या, "तुम्ही जे ठरवाल त्याला मी मत देईन".
आजच्या भागात जय त्याविषयी सुरेखा ताईंसोबत बोलताना दिसणार आहे. जय सुरेखा ताईंना विचारणार आहे, "सुरेखाताई तुम्ही का नाही आलात? तुम्ही येऊन जरी गेला असता तरी चाललं असतं". त्यावर सुरेखा ताईंच बोलतात,"मी तिथे यायचं, तुम्ही मला उतरवणार. त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरी आहे". त्यानंतर जय त्यांना मुद्दा समजवण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे.
आज स्नेहा, दादुस आणि सुरेखाताई त्यांच्या नाराजीबद्दल बोलताना दिसून येणार आहेत. सुरेखा ताईंनी त्यांची नाराजी स्पष्टपणे स्नेहा समोर व्यक्त केली आहे. सुरेखा ताईंच्या बोलण्याने स्नेहा दुखावली जाणार आहे. स्नेहा सुरेखाताईंना म्हणाली, "अरे ताई असं का बोलत आहात?" त्यावर सुरेखा ताई म्हणाल्या,"याच शब्दात सांगते तुला, आम्हा तिघांनाही तसं जाणवलं आहे. आपल्याला जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपण खांदा शोधतो आणि दुसरे मिळाले की...ज्या पद्धतीने तु गेलीस". त्यानंतर स्नेहा दादूसला विचारते,"आता तुम्हाला काही बोलायचे आहे. मला काही चार शब्द ऐकवायचे आहेत का? का तुम्हाला देखील असं वाटतयं माझ्याकडे नवीन खांदा आला आहे म्हणून मी तुम्हा तिघांना विसरले".
काल स्नेहा आणि आदिशमध्ये पुन्हा एकदा वाद झालेले दिसून आले होते. आदिश घरामध्ये आल्यापासून प्रत्येक सदस्यासोबत हुज्जत घालताना दिसून येतो आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरात खळबळ उडाली आहे. घरातील सदस्य त्याच्या विरोधात बोलताना दिसून येत आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गटात नकारात्मक भावना आहेत. त्या वेळोवेळी दिसून येत आहेत. आदिश आणि जयनंतर आता स्नेहा आणि आदिशमध्ये देखील वाद होणार आहेत. काल एका टास्क दरम्यान आदिश स्नेहाकसोबत चर्चा करताना दिसून आला होता. पण त्या चर्चेचे रुपांतर भांडणात झालेले पाहायला मिळाले. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागला होता.