Shabbas Sunbai : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजपासून 'शाब्बास सुनबाई' (Shabbas Sunbai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहू पाहणाऱ्या एका ध्येयवादी सूनेची म्हणजेच संजीवनीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. 


'शाब्बास सुनबाई' या मालिकेचं कथानक काय?


'शाब्बास सुनबाई' ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलंय. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सतत पहिलं यावं आणि सर्वोत्कृष्ट असावं. तिने तिच्या वडलांच्या स्वप्नाला आपलसं करत नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत स्वतःचं शैक्षणिक वर्षांत नाव कमावलं आहे. 


संजीवनीच्या स्वप्नांना खरा संघर्ष करावा लागणार आहे तो तिच्या लग्नानंतर. कसं आहे तिचं सासर ? संजीवनीला लग्नानंतर नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? प्रवाहाविरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार का? अशा अनेक प्रश्नांभोवती मालिका गुंफलेली आहे. 






'शाब्बास सुनबाई' या मालिकेत नायिकेच्या भूमिकेत रश्मी अनपट तर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत मयूर खांडगे दिसणार आहेत. शार्दुल सराफ आणि पूर्णानंद वांढेकरने या मालिकेचं लेखन तर दिनेश घोगळे यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


'शाब्बास सुनबाई' या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेची प्रतीक्षा करत होते. अखेर आजपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. रश्मी अनपटला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


शाब्बास सुनबाई
कधी पासून होणार सुरू? 14 नोव्हेंबर
किती वाजता? सोमवार ते शनिवार रात्री सात वाजता
कुठे पाहू शकता? सन मराठी


संबंधित बातम्या


Bigg Boss 16: वरुण आणि नताशाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचे आगमन? बिग बॉसच्या मंचावर सलमाननं दिली हिंट