मुंबई : 'द कपिल शर्मा शो' लोकप्रिय टीव्ही शो आज ट्विटरवर ट्रेण्डिंग आहे. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमुळे एकीकडे कपिल शर्मा शोवर कौतुकाचा वर्षावही झाला आणि टीकेची झोडही उठली. याला कारण ठरलं किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक या जोडगोळीने सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि बॉलिवूड ड्रग्ज नेक्सस प्रकरणात एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टिंग स्टाईलवर केलेलं भाष्य. यानंतर ट्विटरवर #TheKapilSharmaShow आणि #BoycottKapilSharmaShow हे दोन हॅशटॅग टॉप ट्रेण्डिंगमध्ये आले.


या एपिसोडमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शत अनुभव सिन्हा पाहुणे होते. बंबई में का बा या म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसाठी ते आले होते.





या शोमध्ये रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची मिमिक्री करण्यात आली. बच्चा यादवचं पात्र साकारणाऱ्या किकू शारदाने कालच्या एपिसोडमध्ये अर्णब गोस्वामी यांची मिमिक्री केली. या एपिसोडमध्ये किकू शारदा आरडाओरडा करुन अँकरिंग करत असून तो कोणालाही बोलू देत नाही. शिवाय काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या 'मुझे ड्रग्ज दो' या वाक्यावरुन तयार करण्यात आलेल्या पॅरडी व्हिडीओचा स्किटमध्ये उल्लेख 'मुझे जग दो' असा करण्यात आला आहे. हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर, उस्फुर्त प्रतिसाद म्हणून ट्विटर #TheKapilSharmaShow हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला.











#BoycottKapilSharmaShow ट्रेण्डिंगमध्ये
मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर अशाप्रकारे भाष्य करणं सुशांतच्या चाहत्यांना आवडलं नाही. त्यामुळे काही वेळाने या हॅशटॅगला उत्तर म्हणून #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. काही ट्विटर युझर्सनी या शोवर बहिष्कार घालण्याची मागणी केली.








सलमानने वचपा काढला?


खरंतर अभिनेता सलमान खान हा 'द कपिल शर्मा शो'चा निर्माता आहे. काही दिवसापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी आपल्या कार्यक्रमात सलमान खानवरही निशाणा साधला होता. सलमान कुठे आहे, ड्रग्ज माफियाविरोधात आता का बोलत नाही. एक वक्तव्य नाही, ट्वीट नाही. दिशा सालियान प्रकरणी, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एकही वाक्य नाही. कुठे आहेस तू सलमान? कोणत्या देशात आहेस?, असे प्रश्न अर्णब गोस्वामी यांनी विचारले होते. यावर सलमानने कोणतंही भाष्य केलं नव्हतं. मात्र आता द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून सलमानने वचपा काढल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.